दररोज १२५ जम्बो सिलिंडर भरण्याची क्षमता

पालघर : पालघर, डहाणू व जव्हार या ठिकाणी प्राणवायू उत्पादन प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या आठवडाभरात या प्रकल्पामधून उत्पादित होणारा प्राणवायू करोना रुग्णांना देता येऊ शकेल.

पालघरच्या ग्रामीण रुग्णालय तसेच डहाणू व जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालय ५९० लिटर प्रति मिनिट क्षमतेचा प्राणवायू उत्पादन प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पासाठी सुमारे सव्वातीन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पातून दररोज एकशे पंचवीस जम्बो सिलिंडर भरण्याची क्षमता असून प्राणवायूची गरज भासणाऱ्या साठ रुग्णांना हा प्रकल्प प्राणवायू पुरवठा करू शकेल अशी स्थिती आहे.

या प्रकल्पाच्या उभारणीकरिता आवश्यक यंत्रसामग्री या तिन्ही आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी पोहोचले असून उभारणी पूर्ण करण्यासाठी विद्युत प्रवाह जोडणी काम करणे व इतर तांत्रिक कामांचे पूर्तता हाती घेण्यात आली आहेत.

या प्रकल्पाची उभारणी करणारी तज्ज्ञ मंडळी पालघरमध्ये दाखल झाली असून पालघर प्रकल्प कार्यान्वित केल्यानंतर तर डहाणू व जव्हार येथील प्रकल्प कार्यरत केला जाईल असे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांनी सांगितले.