सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

पालघर : पालघर जिल्ह्य़ाच्या विशेषत: डोंगरी भागात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्य़ातील सर्व नद्या ओसंडून वाहत आहेत. नदी किनारी असणाऱ्या गावांना पुराचा धोका कायम आहे. वाडा, जव्हारमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.  जिल्ह्य़ात दोन नागरिक वाहून गेले. तर विजेच्या धक्क्य़ाने एकाचा मृत्यू तर दोन गुरेही दगावली आहेत.  दरड कोसळल्याने जव्हार-नाशिक मार्गदेखील दिवसभर बंद होता.

सलग दोन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे जव्हार तालुक्यातील चोथ्याचीवाडी-पाथर्डी-वंगणपाडा रस्ता खचला आहे. चांभारशेत येथे पाण्यात अडकलेल्या १५ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. विक्रमगड तालुक्यातील कुझ्रे येथील रामा ठाकरे (५३) हा पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला. तर वसुरी येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून घराचे नुकसान झाले आहे. वाडा तालुक्यात पालीरोड-वसुली- आपटी रस्त्यावर दगड वाहून आले आहेत. बोरांडे, अंबिस्ते, शेल्टे येथील कुटुंबीयांना सुरक्षिततेच्या कारणास्तव स्थलांतरित करण्यात  आले आहे.

या तालुक्यात झाडे उन्मळून पडल्याचे व घराचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मोखाडा येथे २३ घरांचे व एका शाळेचे अंशत: नुकसान नुकसान झाले असून सावर्डे व कोरेगाव खोडाळा रस्त्यावर दरड कोसळली आहे. याखेरीज तालुक्यातील काही रस्ते खचल्याचा व साकव भराव वाहून गेल्याचे आढळून आले आहे.  पालघर तालुक्यात सावरा एमबुर येथील दर्शना दिलीप दूतकर (५०) ही महिला पुराच्या पाण्यात वाहून गेली असून मासवण येथील गौतम शिरीष धानवा याचा विजेचा धक्क्य़ाने मृत्यू ओढवला आहे. पालघर तालुक्यात आठ घरांचे नुकसान झाले आहे. ३४ घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. मनोर व बांधण येथील पूल पाण्याखाली गेल्याने काही काळ वाहतूक बंद होती. तर मनोरजवळील हॉटेल शिमला इनजवळ राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पावसाचा जोर ओसरल्यानंतर सकाळी वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

डहाणू तालुक्यात दोन गुरांचा विजेचा धक्क्य़ाने मृत्यू झाला असून आठ घरांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे ३० घरांमध्ये पाणी शिरल्याने घरगुती वस्तूंचे नुकसान झाले आहे.

या खेरीज जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.  सलग दोन दिवस जिल्ह्य़ात दमदार पाऊस पडल्याने सर्व नदी-नाले भरभरून वाहत आहेत. अनेकदा मेघगर्जना व जोरदार वाऱ्यासह पाऊस झाल्याने काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटनादेखील पुढे आल्या आहेत.  जव्हार व मोखाडा तालुक्यात बुधवारी दिवसभर पाऊस कोसळत राहिला होता.

मालमत्तेचे नुकसान पालघर, मोखाडा, डहाणू तालुक्यात शेकडो घरांत पुराचे पाणी शिरून मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तर दोन जण वाहून गेले आहेत.   काही ठिकाणी दरड कोसळणे, झाडे उन्मळून पडणे तसेच  काही ठिकाणी शॉर्टसर्किटने घरांना आगी लागण्याच्याही घटना घडल्या.  तालुक्यांतील अनेक गावांत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

जव्हारमध्ये ४३४ मि.मी. पाऊस

२२ जुलै रोजी सकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्य़ात सरासरी १७८ मि.मी.पावसाची नोंद झाली.  वाडा  ३५५ , जव्हार  ३४५, मोखाडा  २९२, विक्रमगड   १६५, पालघर  १०० तर डहाणू तालुक्यात ७१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  जव्हार क्षेत्रामध्ये  गेल्या २४ तासांत  ४३४ मि.मी. विक्रमी पावसाची नोंद झाली. २१ जुलै रोजी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्य़ात सरासरी ७९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.