साथीच्या आजाराचा फैलाव; करोनाची भीती

पालघर : शाळा-महाविद्यालयांना सुरू करण्याबाबत जिल्हास्तरावर कोणतेही आदेश नसताना बोईसर परिसरात मोठय़ा संख्येने खासगी शिकवण्या संस्था सुरू झाले आहेत. तर दुसरीकडे दिवसाला किमान एक हजार सर्दी, खोकला, तापाने आजारी असलेली मुले औषधोपचारासाठी विविध दवाखान्यात येत आहे. बहुतांश बालकांना करोनाची लागण जरी नसली तरी अशीच परिस्थिती कायम राहिल्यास करोना सुप्तपणे शिरकाव करेल, अशी भीती बालरोग तज्ज्ञांना  वाटत आहे.

बोईसर परिसरातील चार बालरोगतज्ज्ञांकडे दररोज किमान प्रत्येकी शंभर ते दीडशे बालक  उपचारासाठी येत आहेत. त्याचबरोबरीने शहरात असलेल्या विविध वैद्यकीय अधिकारी-डॉक्टर, खासगी रुग्णालयांची संख्या पाहता सध्या दररोज एक हजार नवीन बालकांना सर्दी, तापाचा संसर्ग झाल्याचे दिसून येते. यापैकी संशयित बालकांचे करोना चाचणी केली असता करोना संसर्ग झाल्याची संख्या अत्यल्प असली तरीही या आजाराच्या या काळात करोनाने शिरकाव केल्यास तिसऱ्या लाटेचा आरंभ होण्याची भीती डॉक्टरांकडून व्यक्त होत आहे.

उपचारासाठी येणाऱ्या बालकांच्या पालकांशी आजाराची पार्श्वभूमी घेताना अनेक डॉक्टरांना आजाराची लागण सुरू असलेल्या खासगी शिक्षणाच्या स्रोतांकडून झाल्याची माहिती पुढे आली आहे.

हे गेल्या वर्षभरापासून ऑनलाइन पद्धतीने आपली मुले अभ्यास करीत नसल्याने अनेक पालकांनी आपल्या मुलांना खासगी शिकवण्या संस्था, घरगुती शिकवण्यांना पाठवत असल्याचे डॉक्टरांना माहिती दिली. एकीकडे शाळा सुरू करण्याची परवानगी नसताना बोईसर व इतर शहरी भागांमध्ये सुरू झालेल्या खासगी संस्था व शिकवण्यांवर रोख लावण्यावर शिक्षण विभाग अपयशी ठरले आहे.

अशीच परिस्थिती कायम राहिली किंवा उपचारासाठी येणाऱ्या एखाद्या मुलांना करोनाची लागण झाली तर आजाराचा प्रसार झपाटय़ाने होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.

मुलांसाठी करोना उपचार करण्यासाठी जिल्ह्यत वैद्यकीय सुविधांची मर्यादा असताना मुलांना तिसऱ्या लाटेपासून सुरक्षित ठेवण्याचे आव्हान जिल्हा प्रशासना समोर आहे.

या संदर्भात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांच्यामार्फत विविध अशा ठिकाणी पाहणी करून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

बोईसरमध्ये नऊ शिकवणी संस्थांविरुद्ध कारवाई

पालघर : बोईसर येथे अनधिकृतपणे सुरू असलेल्या कोचिंग क्लासेसबाबत जिल्हा परिषदेकडे विचारणा केली असता पालघर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथक नेमून तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. या पथकाने बोईसर परिसरात विविध भागात पाहणी करून कोचिंग क्लासेस व शिकवणी घेत असलेल्या नऊ ठिकाणी छापे टाकून त्यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत बोईसर ग्रामपंचायतीतर्फे गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.