नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; अनेक गावांचा संपर्क तुटला

वाडा : गेल्या तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने  बुधवारी (२१ जुलै) रौद्र रूप धारण केले. येथील तानसा, वैतरणा, गारगाई, पिंजाळी, देहर्जा या पाचही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या नदीकाठच्या काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून भातशेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.

तानसा नदीला आलेल्या महापुरात या नदीकाठच्या निंबवली, अकलोली कुंड, या गावातील काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. वैतरणा नदीचे पाणी बोरांडा येथील कातकरी वाडीत शिरल्याने येथील अनेक आदिवासी कुटुंबीयांचे अन्नधान्य व संसार उपयोगी वस्तूंचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. पिंजाळी नदीला आलेल्या महापुरात नदीकाठच्या पीक, मलवाडा या गावांतील काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. गारगाई नदीवरील शिलोत्तर येथील पुल पाण्याखाली गेल्याने या भागाचा संपर्क तुटला आहे. तसाच प्रकार  देहर्जा या नदीवर कुंझ्रे येथील पुल व शिळ – देहर्जा येथील पूल पाण्याखाली गेल्याने या परिसरातील दहा ते पंधरा गावांचा संपर्क तुटला आहे.

या अतिवृष्टीमुळे वाडा तालुक्यातील भातशेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे बांध वाहून गेले आहेत, तर अलीकडेच लागवड केलेल्या भाताची रोपे वाहुन गेली आहेत. बांध वाहून माती शेतातील भात रोपांवर जाऊन भाताची रोपे गाढली गेली आहेत. तालुक्यातील लहानमोठे नाले ओसंडून वाहू लागले आहेत. या नाल्यांचे पाणी रस्त्यांवर आल्याने अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. गोऱ्हे – नाणे, मलवाडा – पीक, कोने – मोज, वाडा – खर्डी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती पालघरचे जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी दिली. दरम्यान अतिवृष्टीत कुठेही जीवित हानी झालेली नसल्याची माहिती वाडा तहसीलदार उद्धव कदम यांनी दिली.