News Flash

उद्योगांवर संकट

सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी एमआयडीसीच्या सांडपाणी साठवण्याच्या टाकीमध्ये एकत्र करून हे सांडपाणी  वाहिन्यांद्वारे नवापूर येथील समुद्रात सुमारे पाचशे मीटर खोलीवर सोडण्यात येते

उद्योगांवर संकट

तारापूरमध्ये सांडपाणी जलवाहिनीच्या गळतीचा उत्पादनावर परिणाम

पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून प्रक्रिया केलेले सांडपाणी नवापूर येथील समुद्रात वाहून नेणाऱ्या जलवाहिनीतून वारंवार होणारी गळती ही उद्योजकांची डोकेदुखी झाली आहे.  जलवाहिनी फुटल्यानंतर  ती  दुरुस्ती होईपर्यंत  उद्योगांचा पाणीपुरवठा एमआयडीसी बंद करत असल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम होत आहे.

सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी एमआयडीसीच्या सांडपाणी साठवण्याच्या टाकीमध्ये एकत्र करून हे सांडपाणी  वाहिन्यांद्वारे नवापूर येथील समुद्रात सुमारे पाचशे मीटर खोलीवर सोडण्यात येते. १९७०- १९८० च्या सुमारास टाकण्यात आलेल्या या जलवाहिन्या सिमेंटच्या असून त्या जीर्ण झालेल्या आहेत.  त्यांची दाब सहन करण्याची क्षमता मर्यादित झाल्यामुळे या  वाहिनींमध्ये अनेकदा गळती होते. गेल्या  दीड महिन्याच्या काळात गळती होण्याचे प्रमाण वाढले आहे.  किमान पाच ते सहा ठिकाणी सांडपाणी जलवाहिनी फुटण्याचे प्रकार घडले आहेत.  जलवाहिनी फुटल्यानंतर एमआयडीसीकडून  उद्योगांना पाणीपुरवठा बंद करण्यात येतो. दुरुस्तीचे काम दोन ते तीन दिवस सुरू  राहत असल्याने त्याचा फटका तारापूरमधील उद्योगांना त्यांच्या उत्पादनावर होत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.

सांडपाणी जलवाहिनी फुटल्यानंतर उद्योगांच्या आवारातील सांडपाणी सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे न पाठवण्याच्या सूचना देण्यात येतात. तरी कंपनीमधील पाण्याच्या असलेल्या साठय़ातून उत्पादन सुरू ठेवण्यात येते. सांडपाणी वाहून नेणारी व्यवस्था पूर्ववत झाल्यानंतर उद्योगांमध्ये साठविलेले सांडपाणी अल्पावधीत सोडले जात असल्याने सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून भरून वाहते.  प्रकल्पाच्या कार्यक्षमतेवरही त्याचा परिणाम होतो असे  सांगण्यात येते. त्यामुळे उत्पादनाबरोबरच सांडपाणी प्रक्रियेच्या कार्यक्षमतेबाबत उद्योजकांकडून प्रश्नचिन्ह  उपस्थित करण्यात आले आहे.

 पाइपलाइनचे आगीने नुकसान

नवापूर खाडी क्षेत्रात टाकण्यासाठी तयार करून ठेवण्यात आलेले एक हजार व बाराशे मिलीमीटर व्यासाचे एचडीपीई पाइप कोलवडा नाका परिसरात एमआयडीसीच्या एका मोकळ्या प्लॉटमध्ये ठेवण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वी त्या ठिकाणी आग लागल्याने यापैकी अनेक पाइपचे नुकसान झाले. संबंधित ठेकेदाराने यासंदर्भात उत्पादन करणाऱ्या कंपनीला नव्या पाइपची ऑर्डर दिली असून हे पाइप उपलब्ध झाल्यानंतर अपूर्ण काम हाती घेण्यात येईल,  असे देखील एमआयडीसी अधिकाऱ्यांनी लोकसत्ताला सांगितले.

समुद्रातून जलवाहिनी टाकण्याचे काम रेंगाळले

तारापूर औद्योगिक वसाहतीमधून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे सांडपाणी उच्चतम भरती रेषेपासून ७.२ किलोमीटर अंतरावर सोडण्याचा १२० कोटी रुपयांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प एमआयडीसीने गेल्या काही वर्षांपासून हाती घेतला आहे. या प्रकल्पाला नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशिनोग्राफी यांनी मान्यता दिली असून त्याचे काम गेल्या काही वर्षांंपासून सुरू आहे. समुद्रतळावरून जलवाहिनी टाकण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून नवापूर खाडी क्षेत्रातील सीआरझेड पट्टय़ातील १.२ किलोमीटरची जलवाहिनी टाकण्याचे काम अजूनही प्रलंबित आहे. विशेष म्हणजे या ठिकाणाहून जुनी सांडपाणी जलवाहिनी जात असताना शासकीय व पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या सीआरझेड परवानगीसाठी तब्बल तीन वर्षांचा कालावधी लागल्याची माहिती पुढे आली आहे. या जलवाहिनी टाकण्याच्या प्रलंबित कामांना तातडीने हाती घेण्यात येईल,  असे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2021 2:07 am

Web Title: sand water channel tarapur ssh 93
Next Stories
1 विरार-सुरत रेल्वेमहामार्गालगत संरक्षक भिंतीची उभारणी
2 टाळेबंदीमुळे डहाणूतील फुगा व्यवसाय डबघाईला
3 शेतीच्या कामांना वेग
Just Now!
X