आदिवासी भागातील १० विद्यार्थ्यांना गिनीज बुकसह चार संस्थांकडून गौरवपत्र

विजय राऊत

कासा: पालघर जिल्ह्य़ातील आदिवासी दुर्गम भागातील दहा विद्यार्थ्यांनी ‘स्पेस रिसर्च पेलोड व्युब चॅलेंज २०२१’ या अवकाशात सोडल्या जाणाऱ्या उपग्रह निर्मिती उपक्रमात सहभाग घेतल्याने जागतिक ओळख मिळाली आहे. त्याच्या या यशाबद्दल ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’सह  चार विक्रम नोंदविणाऱ्या संस्थांनी त्यांची नोंद घेत त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे.

डहाणू तालुक्यातील अनुदानित आश्रमशाळा रानशेत येथील इयत्ता १० वी व १२ वीच्या दहा विद्यार्थ्यांनी दिनांक १९ जानेवारी २०२१ रोजी पुणे येथील ‘जयवंतराव सावंत अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात संपन्न झालेल्या उपग्रह निर्मिती कार्यशाळेत सहभाग घेत उपग्रह जोडणी केली होती. या कार्यशाळेत उपग्रह केस सोबत पॅराशूट, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टम, लाइव्ह कॅमेरा या साधनांचा उपयोग करून उपग्रहाची जोडणी केली.

उपग्रह जोडणी करण्यासाठी या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतील शिक्षकांकडून तसेच डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम आंतराष्ट्रीय फाऊंडेशन, रामेश्वरम च्या माध्यमातून  दोन महिने ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले होते. मुलांचे मनोबल वाढविण्यासाठी व तसेच उपग्रह जोडणीची तयारी करून घेण्यासाठी शाळेतील विज्ञान विषय शिकवणारे शिक्षक बापू चव्हाण तसेच गणित विषय शिकवणाऱ्या शिक्षिका वैशाली गवादे यांनी मुलांची पूर्ण तयारी करून घेतली.

अशा प्रकारे संपूर्ण देशातून १०० उपग्रह तयार करण्यात आले. या सर्व उपग्रहांचे ७ फेब्रुवारी २०२१ रोजी डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मस्थान असलेल्या रामेश्वरम येथून हेलियम बलूनच्या साहाय्याने अवकाशात सुमारे ३५,००० ते ३८००० मीटर उंचीवर प्रस्थापित केले. या विविध उपग्रहाद्वारे ओझोन थराचा, वातावरणात होणाऱ्या बदलांचा तसेच कृषीविषयक अभ्यास, प्रदूषणाची पातळी या विषयांचा शास्त्रीय अभ्यास करण्यात आला. जागतिक पातळीवर पहिल्यांदाच शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेले १०० उपग्रह एकाच वेळी अवकाशात सोडण्याचा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. त्यामुळे या उपक्रमाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’, ‘असिस्ट वर्ल्ड  रेकॉर्ड’, ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन’, ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड’, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ या पाच संस्थांनी घेतली.

त्याचप्रमाणे या उपक्रमात सहभागी झालेल्या पालघर जिल्ह्यतील सहा मुली आणि चार मुले अशा १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी नोंदवल्याबद्दल विक्रम नोंदविणाऱ्या संस्थांनी त्यांना प्रमाणपत्र तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. यात अंकुश मोरे, मंजुळा मलावकर, प्रफुल्ल सातवी , साईनाथ कोंब, प्रशांत भोईर (सर्व दहावीतील), तर मनाली बाळशी, नंदिता वाढाण, मनीषा जाधव, श्रेया पारधी, अंजू भोईर (सर्व बारावी) यांचा समावेश आहे.

या उपक्रमात सहभागी झाल्याने आम्हाला उपग्रह तयार करण्याचा नावीन्यपूर्ण अनुभव आला. भविष्यातही देशाच्या सेवेसाठी नवनवीन शोध लावण्याचे  प्रयत्न करणार आहोत. तसेच डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे स्वप्न साकार करून दाखवू.

– मनाली बाळशी, विद्यार्थी

सदर उपक्रमाची माहिती मिळाल्यानंतर आम्ही ऑनलाइन प्रशिक्षण घेत तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुणे येथे जाऊन विद्यार्थ्यांनी उपग्रह जोडणी केली. तो प्रयोग यशस्वी झाल्यामुळे त्यांची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’सह पाच रेकॉर्डमध्ये झाली आहे. या विद्यार्थ्यांच्या यशामुळे आमच्या शाळेचे नाव जागतिक पातळीवर नोंदविले गेल्याने अभिमान वाटत आहे.

– बापू चव्हाण, विज्ञान शिक्षक, अनुदानित आश्रमशाळा रानशेत