ताप, सर्दी, खोकल्याने नागरिक हैराण, रुग्णांमध्ये वाढ

पालघर : पालघर जिल्ह्य़ातील ग्रामीण भागासह काही शहरी भागांमध्ये विषाणूजन्य आजार फैलावला आहे. सामान्य ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे, डोळे जळजळणे असे विषाणूजन्य (वायरल) आजाराने नागरिक हैराण झाले आहेत.  दररोज तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. शासकीय रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयांत रुग्ण मोठय़ा प्रमाणात येताना दिसत आहेत.

सध्या वातावरणात बदल होत असल्यामुळे  हे आजार बळावत चालले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्याची प्रचीती येत असल्याचे  काही तज्ज्ञांचे मत आहे.  मात्र, याचा करोनाशी कोणताही थेट संबंध येत नाही, असे सांगितले जाते.  ज्या रुग्णांना संशयास्पद लक्षणे असल्याचे दिसून येते त्यांची तशा प्रकारची चाचणी करूनच निदान केले जात असल्याचे रुग्णालयातील काही आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.  दोन-तीन आठवडय़ांपासून जिल्ह्य़ातील मोखाडा, वाडा, विक्रमगड, डहाणू, पालघर, तलासरी अशा ग्रामीण भागांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय तसेच खासगी रुग्णालय येथे विषाणूजन्य आजार बळावलेल्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

गेल्या काही दिवसांपासून या रुग्णांच्या संख्येमध्ये दहा पटीने वाढ झाली आहे. अगोदर दररोज तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत दर दिवशी ४० ते ५० रुग्णांची वाढ झाल्याचे दिसून येते.  खोकला, संसर्गजन्य ताप, सर्दी, अंग दुखणे, डोकेदुखी अशा आजारांमध्ये ही वाढ आहे.   रुग्णालयांमध्ये  दररोज येणाऱ्या  रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली असली तरी त्यासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध असल्याचे  प्रशासनाने म्हटले आहे. हवामानातील तापमानात झालेला बदल व वाढलेली उष्णता यामुळे असे आजार बळावत असल्याचे सांगितले जाते. यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.

विषाणूजन्य आजार असले तरी जिल्ह्य़ांमध्ये डेंग्यू, मलेरिया, हिवताप अशा साथीच्या आजाराची तीव्रता कमी आहे. महिन्यातून एखाद दुसरा रुग्ण आढळून येत असला तरी त्याच्यावर उपचार करून तो पूर्णपणे बरा होत असल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. समुद्र किनारपट्टीच्या भागांमध्ये तसेच ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे अशा गावांमध्ये पाणी साठवण्याच्या ठिकाणी डास उत्पत्ती झाल्यामुळे साथ रोगाचे आजार बळावले जात आहे. अशावेळी कोरडा दिवस पाळून साथ रोगावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.

उपायांची अंमलबजावणी

हिवताप, डेंग्यू, मलेरिया असे साथरोग आजार थांबवण्यासाठी पालघर जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्य़ातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना गावागावांमध्ये विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना, नाशक तसेच धूर फवारणी, साचलेल्या पाण्याचे सर्वेक्षण, कोरडा दिवस पाळणे अशा उपाययोजनांची गावांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सूचित करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्य़ातील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये पूर्वी येत असलेल्या बाह्य़रुग्ण विभागाच्या रुग्ण संख्येच्या तुलनेत आता रुग्णांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. याच बरोबरीने प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हीच परिस्थिती आढळून येत आहे. बहुतांश रुग्ण हे विषाणूजन्य आजारांमुळे उपचार घेण्यासाठी या रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी करताना दिसत आहेत.

वातावरणातील बदलांमुळे विषाणूजन्य आजारात मोठी वाढ झाली आहे. नागरिकांनी स्वत:ची काळजी व खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्याचसोबत हयगय न करता रुग्णालयांमध्ये वेळीच उपचार घेणेही तितकेच आवश्यक आहे.

-डॉ. दिनकर गावित, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय पालघर

साथरोग पसरू  नये यासाठी नागरिकांनी आपली नैतिक जबाबदारी ओळखली पाहिजे. डास उत्पत्ती थांबवण्यासाठी त्याच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्यातूनच साथ रोगाचे निर्मूलन शक्य आहे.

-डॉ. सागर पाटील, जिल्हा सर्वेक्षण व साथरोग अधिकारी