फुटलेल्या बंधाऱ्यामुळे नुकसान;  दीड महिना उलटूनही शेल्टेवासीय मदतीच्या प्रतीक्षेत

वाडा: २१ जुलै रोजी मोठय़ा प्रमाणावर कोसळलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेल्टे गावानजीक २० एकर क्षेत्र असलेला शेल्टे बंधारा फुटून या बंधाऱ्याखालील लागवड केलेल्या ३० एकरांहून अधिक क्षेत्रावरील भाताची रोपे दगड, मातीखाली गाडली गेली आहेत. या घटनेला दीड महिना होऊनही येथील बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून एक रुपयाचीही मदत मिळालेली नाही. त्याचबरोबर तलावातून शेतात वाहून आलेले अवजड दगड व माती हटविण्यासाठीही आजवर काहीच उपाययोजना केलेली नाही. आम्हा बाधित शेतकऱ्यांकडे शासन लक्ष देणार आहे की नाही, असा सवाल येथील शेतकरी विचारत आहेत.

२१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत शेल्टे येथील ५० र्वष जुना असलेला भला मोठा (२० एकर क्षेत्र) बंधारा फुटला आणि या बंधाऱ्याखालील ३० एकरांहून अधिक शेतजमीन बंधाऱ्यातील दगड, मातीने गाडली गेली. या घटनेनंतर तात्काळ पालघर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी माणिक गुरसळ तसेच अन्य विभागातील अधिकारी घटनास्थळी येऊन पाहणी करून गेले.

पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी पाहणी केल्यानंतर नुकसानीचे पंचनामे व तातडीची मदत देण्याचे आश्वासन दिले गेले. नुकसानीचे पंचनामे होऊनही गेल्या दीड महिन्यात येथील २० ते २२ बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून एक रुपयाचीही मदत मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे. अचानक बंधारा फुटल्याने तुडुंब भरलेल्या बंधाऱ्यातील पाणी वेगाने येऊन शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले. येथील शेतीचे बांध वाहून जाऊन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. फुटलेल्या या बंधाऱ्यातील माती येथील आदिवासींच्या तीन घरांमध्ये जाऊन प्रचंड नुकसान झाले आहे. या बाधित कुटुंबीयांनाही अजूनपर्यंत शासनाकडून मदत मिळालेली नाही.

या बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग शेल्टे, वावेघर, मुंगुस्ते, गोऱ्हे या चार गावांना होत असे. या पाण्याद्वारे शेकडो शेतकरी उन्हाळ्यात कलिंगड शेती, विविध प्रकारच्या भाजीपाल्याची शेती, कांदाशेती, फुलशेतीसाठी करत असत. मात्र या वर्षी झालेल्या अतिवृष्टीत या बंधाऱ्याचा ६० मीटरहून अधिक लांब व १५ मीटर खोल मातीचा बांध तुटून वाहून गेल्याने या बंधाऱ्यात पुरेसे पाणी राहणार नाही. यामुळे उन्हाळ्यात येथील शेतकऱ्यांना कुठलेही शेती उत्पादन घेता येणार नाही. या चिंतेनेही येथील शेतकऱ्यांनी ग्रासले आहे.

उन्हाळी शेतीला फटका

या बंधाऱ्यातील पाण्याचा वापर करून मोठय़ा प्रमाणावर उन्हाळ्यात विविध पिके घेतली जात होती. बंधारा दुरुस्तीची कुठलीही हालचाल दिसत नसल्याने खरिपाबरोबर रब्बीचेही प्रचंड नुकसान होणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. रोजगाराच्या संधी नसल्याने या परिसरातील अनेक तरुण उन्हाळ्यात कलिंगड, फुलशेती करून उदरनिर्वाह चालवत असतात, मात्र बंधाऱ्यातील पाणी निघून गेल्याने या तरुणांना उन्हाळी नगदी पिकांना मुकावे लागणार आहे.

नुकसानीचे पंचनामे होऊन दीड महिना झाला, तरीही येथील एकाही शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळालेली नाही.

– प्रवीण पाटील, उपसरपंच, शेल्टे, ता. वाडा

नुकसानीचा अंतिम अहवाल येताच बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई दिली जाणार आहे.

– डॉ. उद्धव कदम, तहसीलदार, वाडा