News Flash

विजेविना रुग्णांचे हाल

पालघर जिल्ह्यमध्ये तीन उपजिल्हा रुग्णालये तसेच नऊ ग्रामीण रुग्णालये आहेत.

विजेविना रुग्णांचे हाल

शासकीय रुग्णालयांत वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार, मेणबत्तीच्या प्रकाशात रुग्णसेवा

विजय राऊत
कासा : पालघर जिल्ह्यमध्ये तीन उपजिल्हा रुग्णालये तसेच नऊ ग्रामीण रुग्णालये आहेत. या सर्व रुग्णालयांमध्ये मोठय़ा प्रमाणावर रुग्ण उपचार घेत असतात, परंतु गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. वीज नसताना मोबाइल आणि मेणबत्तीच्या प्रकाशात रुग्णसेवा देण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

पालघर जिल्ह्यत खासगी रुग्णालयांची संख्या कमी आहे. तसेच आदिवासी भाग असल्याने नागरिकांकडे खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेण्यासाठी पैसे नसतात. त्यामुळे ग्रामीण आदिवासी भागातील नागरिकांना उपचारासाठी शासकीय रुग्णालय आणि आरोग्य केंद्रातच जावे लागते. सध्या पावसाळा सुरू असल्याने ग्रामीण भागात मलेरिया, डेंगू, कावीळ अशा साथीच्या आजाराचे रुग्ण आहेत. हे सर्व रुग्ण उपचार घेण्यासाठी शासकीय आरोग्य केंद्रातच दाखल होतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यतील ग्रामीण भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. अनेक शासकीय आरोग्य केंद्रामध्ये जनित्र (जनरेटर) आहेत, परंतु बऱ्याचदा तांत्रिक बिघाडामुळे ते चालू होत नाहीत. काही ठिकाणी इन्व्हर्टर आहेत, परंतु वीजपुरवठा जास्त वेळ खंडित होत असल्याने ते चार्ज होत नाहीत. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास मेणबत्ती किंवा मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करावे लागतात. याचाच फटका ३० ऑगस्ट रोजी मोखाडा येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला बसला. वीजपुरवठा खंडित झाल्याने मेणबत्तीच्या आणि मोबाइलच्या प्रकाशात या महिलेची प्रसूती करण्याची वेळ डॉक्टरांवर आली.

दरम्यान, पालघर जिल्ह्यत ४६ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. विशेषत: जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तलासरी या ग्रामीण आदिवासी भागातील रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल होतात. या भागातील एकाही आरोग्य केंद्रात इन्व्हर्टर किंवा जनरेटरची सुविधा उपलब्ध नाही. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रात्रीच्या वेळी आरोग्य केंद्रात अंधार असतो. त्यामुळे रुग्णांवर रात्रीच्या वेळी मेणबत्तीच्या प्रकाशात उपचार करावे लागतात. काही ठिकाणी इन्व्हर्टर बॅकअप सुविधा आहे, परंतु त्याचा उपयोग फक्त लशीसाठी केला जातो.

मोखाडा येथे जनित्रची सुविधा  होती, परंतु ते चालू होण्यास विलंब झाला त्यामुळे महिलेची प्रसूती मेणबत्तीच्या प्रकाशात करावी लागली.  डॉक्टरांना जनित्रसाठी दोन दिवस पुरेल इतके डिझेल साठा ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच वीज विभागाला  रुग्णालयातील वीज खंडित होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले आहे.

राजेंद्र केळकर, सहाय्यक सिव्हिल सर्जन

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये इन्व्हर्टर सुविधा उपलब्ध आहेत.परंतु त्याचा उपयोग केवळ लसींच्या साठय़ासाठी केला जातो. परंतु एकाही प्राथमिक  आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी इन्व्हर्टर किंवा जनित्र (जनरेटर) सुविधा उपलब्ध नाही.

-डॉ. दयानंद सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2021 2:02 am

Web Title: the condition of patients without electricity ssh 93
Next Stories
1 बोईसर शहरात सांडपाण्यामुळे आरोग्याची समस्या
2 सागरी मासेमारी विधेयकात सुधारणा होणार
3 ‘मॉकड्रील’मुळे गोंधळ
Just Now!
X