एका दिवसात ८० हजार जणांना लसमात्रा

पालघर: लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात मागे पडलेल्या पालघर जिल्ह्यने गेल्या पंधरवडय़ात झपाटय़ाने लसीकरण करण्याचा सपाटा लावला आहे. १ सप्टेंबर रोजी ७१ हजाराचा टप्पा गाठल्यानंतर शनिवारी ४ सप्टेंबर रोजी जिल्ह्यत एका दिवसात ८० हजार ४३ लसीकरण करून नवा उच्चांक गाठला आहे.

यापूर्वी २७ ऑगस्ट रोजी जिल्ह्यत ३६ हजार ७९८ तर १४ आणि १५ ऑगस्ट रोजी प्रत्येकी २४ हजार लसीकरण एका दिवसात पूर्ण केले होते. विशेष म्हणजे शनिवारी जिल्ह्याने ७० हजार लसमात्रेचे नियोजन केले होते. जिल्ह्यत सध्या १२ लाख लसीकरण पूर्ण झाले असून पहिल्या लसमात्रा मिळाल्याची संख्या नऊ लाख तर दोन्ही लसमात्र मिळालेल्या नागरिकांची संख्या तीन लाख १० हजाराच्या पुढे पोहोचली आहे. जिल्ह्यत १३८ शासकीय केंद्रांसह १७९ केंद्रांवर लसीकरणाची सुविधा असून गेल्या महिन्याभरात लस उपलब्धतेमुळे जिल्ह्यतील नागरिकांचे लसीकरण झपाटय़ाने होऊ लागले आहे. प्रत्येक केंद्रावर २०० ते ३०० तसेच शहरी भागातील केंद्रांवर ५०० ते ८०० लसमात्रा देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.