नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार चव्हाटय़ावर;  वाहनचालक, गणेशभक्तांची मोठी गैरसोय

पालघर : दीड दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी पालघर नगर परिषद हद्दीत रस्त्यांच्या खड्डय़ासाठी माती-खडी टाकून तकलादू मलमपट्टी करण्यात आली होती. मात्र याच्या दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाने ही मलमपट्टी धुऊन टाकल्याने रस्त्यांवरील खड्डे पुन्हा एकदा उघडय़ावर पडले असून नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार चव्हाटय़ावर आला आहे.

गौरी गणपती विसर्जनाच्या दिवशीपर्यंत पालघर नगर परिषद हद्दीतील प्रमुख रस्त्यांवर पुन्हा खड्डय़ांचे साम्राज्य दिसून आले. त्यामुळे गणपती विसर्जनासाठी हे खड्डे भाविकांसाठी विघ्न ठरले. वाहनातून गणरायाला नेताना या खड्डय़ांचा सामना करावा लागल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला गेला. दरवर्षीप्रमाणे यंदाही पालघर नगर परिषद हद्दीतील प्रमुख रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य कायम आहे. त्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात या रस्त्यांवर घडून अनेक जण जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

पालघर-बोईसर रस्त्यावर शिवाजी चौक ते कोळगाव ग्रामपंचायत हद्दीपर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या खड्डय़ांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने नंतर खड्डय़ांचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकीस्वारांचे अपघात झाल्याच्या घटना घडतच आहेत. याचबरोबरीने खासगी व सार्वजनिक प्रवासी वाहने या खड्डय़ांतून जात असल्याने प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गोठणपूर परिसरात तर पूर्ण रस्ताच खड्डय़ात गेला आहे.

पालघर-टेंभोडे रस्त्याची तर दुरवस्था झालेली आहे. या रस्त्यावर जगदंबा हॉटेल येथे रस्त्याचा एक पट्टाच खड्डय़ांचा आहे. ओशियन सेंटरनजीक मोठा खड्डा पडला असून पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोन महिलांसह एक ज्येष्ठ नागरिक खड्डय़ात पडल्याची घटना घडली. तर सोमवारी रात्रीच्या सुमारास याच खड्डय़ात एक सायकलस्वार पडून जखमी झाला. नगर परिषदेच्या नगराध्यक्षा यांच्यासह मुख्याधिकारी यांनाही ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली होती. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. याच रस्त्यावर धडा हॉस्पिटलसमोर रस्त्याचा काही भाग खड्डय़ांमध्ये गेला आहे. रस्त्यात खड्डे की खड्डय़ांत रस्ते हेच वाहनचालकांना व पादचाऱ्यांना समजत नसल्याचे ते सांगत आहेत. पुढे वृंदावन पार्क परिसरापासून ते आंबेडकर चौकपर्यंत लहान-मोठय़ा खड्डय़ांचा अनुभव दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना येत आहे. शिवाजी चौक ते आंबेडकर चौक रस्त्यावरही अनेक ठिकाणी खड्डय़ांचे साम्राज्य पाहावयास मिळते. आंबेडकर चौक परिसरात गणेश विसर्जन होणाऱ्या श्रीगणेश कुंडनजीकही मोठमोठे खड्डे पडल्यामुळे गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय होत आहे.

गणपती आगमनाच्या वेळी हे खड्डे कायम होते. मात्र दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाच्या वेळी या खड्डय़ांमध्ये खडी-माती टाकून तकलादू मलमपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर पडलेल्या मुसळधार पावसामुळे या खड्डय़ातील माती व खडी पूर्णपणे वाहून गेल्यामुळे हे खड्डे आता उघडय़ावर पडले आहेत. वाहनचालकांसह पादचाऱ्यांना या खड्डय़ांमुळे गैरसोय होत असल्याने नगर परिषदेसह सार्वजनिक बांधकाम विभागावर नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. लवकरात लवकर हे खड्डे बुजवून दिलासा देण्याची मागणी केली जात आहे.