बेशिस्त पार्किंग, फेरीवाले, भाजी विक्रेत्यांमुळे रहदारी अडथळे

डहाणू : डहाणू शहरातील मुख्य रस्त्यांवर बेशिस्त वाहनांमुळे इराणी रोड, स्टेशन रोड, थर्मल पॉवर रोडवर पार्किंगची समस्या भेडसावत आहे. अवैध पार्किंग आणि बेशिस्त वाहनांमुळे नागरिक,  विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक, महिला, लहान बालके यांना रस्ता ओलांडण्यासाठी जोखीम पत्करावी लागते. त्यामुळे नागरिकांकडून पोलिसांना याविरुद्ध कारवाईसाठी मोहीम हाती घेण्याची मागणी होत आहे. भाजीवाल्यांच्या हातगाडय़ांमुळे रस्ते व्यापले जात असल्यामुळे रहदारीची समस्या जटिल बनली आहे.

डहाणू नगर परिषद हद्दीतील इराणी रोड, थर्मल पॉवर रोड आणि डहाणू रोड रेल्वे स्थानक ते सागर नाका रोड यावर दररोज मोठय़ा प्रमाणात बेकायदा वाहने उभी करून ठेवलेली असतात. शिवाय फेरीवाले, हातगाडीवाले, भाजी विक्रेतेही रस्त्यावर ठाण मांडून बसलेले असतात. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले होते. या कोंडीमुळे अनेक लहान-मोठे अपघातही घडत होते. या प्रकारामुळे नागरिकांत नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जात होता.

त्यात भर म्हणून पहाटे डहाणू बाजारपेठेत नाशिक येथून भाजीपाला घेऊन येणारी मोठमोठी वाहने रस्त्यावर उभी रीहात असल्याने मुंबई आणि गुजरात भागात नोकरी-व्यवसायानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना डहाणू रोड रेल्वे स्थानकात जाणे जिकिरीचे झाले होते. या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाले, हातगाडीवाले, भाजी विक्रेते आणि रिक्षावाले यांच्यामुळे नागरिकांना दिवसभर त्रास सहन करावा लागतो. गेल्या अनेक दिवसांपासून नगर परिषद प्रशासन रस्त्यावर बेकायदेशीरपणे वाहने पा पार्किंगचे करणाऱ्यांवर काहीही कारवाई करीत नसल्याने दिवसेंदिवस वाहतूक समस्या गंभीर होत चालली आहे. दरम्यान, पोलिसांच्या पथकाने बेकायदेशीरपणे रस्त्यावर उभी केलेली वाहने आणि फेरीवाल्यांना हटविण्याची मोहीम राबविण्याची गरज आहे.

डहाणू तालुक्यातील मुख्य रस्ते, फेरीवाले, हातगाडीवाले, फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते आणि रिक्षावाल्यांनी मुख्य रस्ते अडवले आहेत. नागरिकांना वाहने चालविताना, रस्ता ओलांडताना मोठी समस्या निर्माण होत आहे. याबाबत डहाणू नगर परिषदेकडे नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर रस्त्याच्या दुभाजकामध्ये जाळ्या बसवण्यात आल्या आहेत.

डहाणू शहरात वाहनांना पार्किंगचे नियम आखून दिले आहेत.

– राहुल सारंग, प्रभारी मुख्याधिकारी, डहाणू नगर परिषद