नियमांचे पालन न केल्यामुळे कारवाई

पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांना कंपनीच्या आवाराबाहेर सांडपाणी सोडताना विशिष्ट पद्धतीची स्काडा प्रणाली बसवणे बंधनकारक केले होते. या नियमांचे पालन न करणाऱ्या ६८ उद्योगांचा पाणीपुरवठा बंद करण्याची सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिल्या आहेत. त्याचबरोबरीने या उद्योगातील सांडपाणी सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात न स्वीकारण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.

लघु उद्योगांना सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यास सोयीचे व्हावे म्हणून सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले होते. मात्र उद्योगांनी सांडपाण्यावर प्राथमिक प्रक्रिया करणे अपेक्षित असताना त्याचे उल्लंघन होत असल्याने सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची कार्यक्षमता कमी झाल्याचे अभ्यासात दिसून आले होते. त्यावर रोख बसवण्यासाठी जानेवारी २०२१ मध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्व प्रदूषणकारी उद्योगांनी त्यांच्या सांडपाणी वाहिनीवर स्काडा प्रणाली, नॉन रिटर्न वॉल व ऑटो सॅम्पलर २६ फेब्रुवारी २०२१ पूर्वी बसवण्याचे बंधनकारक केले होते. मात्र करोना पार्श्वभूमीवर उद्योगांना ही यंत्रसामुग्री बसवण्यास शिथिलता देण्यात आली होती.  प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून विविध उद्योगातील सांडपाण्याच्या दर्जावर देखरेख ठेवणे या  तंत्रज्ञामुळे शक्य होत आहे. मात्र आवश्यक यंत्रसामुग्री न बसवणाऱ्या उद्योगांचे २० जूनपासून पाणीपुरवठा बंद करण्याच्या सूचना एमआयडीसीला देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबरीने या उद्योगांमधून निर्मित होणारे सांडपाणी सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राने स्वीकारू नये, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहे. या ६८ उद्योगांमध्ये लघु व मध्यम स्वरूपाचे रसायन उत्पादक, औषधरसायन उत्पादक व औषधनिर्मिती (फार्मासिटिकल) उद्योगांचा समावेश आहे.