बोईसर : मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या कामाने पालघर जिल्ह्यात चांगलाच वेग घेतला आहे.  महामार्गाचे आत्तापर्यंत जवळपास १० टक्के काम पूर्ण झाले असून मार्च २०२४ पर्यंत संपूर्ण १०० टक्के काम पूर्ण करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आहे. मुंबई ते दिल्ली हा १३५० किमी लांबीचा आणि आठ पदरी असलेला देशातील पहिलाच ग्रीनफिल्ड आणि संपूर्ण एक्सेस कंट्रोल एक्सप्रेस हायवे असणार असून सध्या २४ तासांचे हे दोन प्रमुख शहरातील अंतर महामार्ग पूर्ण झाल्यानंतर अवघ्या १२ तासांत गाठणे शक्य होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या द्रुतगती महामार्गामुळे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली ही राज्ये एकमेकांना जोडली जाऊन वाहतूक जलदगतीने होणार आहे व त्यामुळे पालघर जिल्ह्यातील आदिवासी व  मागास भागातील विकासाला मोठी चालना मिळणार आहे.  महामार्गाचे काम पालघर जिल्ह्यात एकूण तीन  टप्प्यात  सुरू असून यातील टप्पा क्र. ११ मध्ये गंजाड ते तलासरीपर्यंत २६ किमीचे काम आरकेसी इन्फ्राबिल्ट, टप्पा क्र. १२ गंजाड ते मासवणपर्यंत २६ किमीचे काम मोंटेकार्लो आणि टप्पा क्र. १३ मासवण ते शिरसाडपर्यंत २७ किमीचे काम जीआर इन्फ्रा या कंपनीला देण्यात आले. जमिनीवरील प्रत्यक्ष कामांस सुरुवात करण्यात आली असून सध्या जमिनीचे सपाटीकरण, भराव, भुयारी मार्ग  आणि पुलांची कामे जलदगतीने सुरू आहेत.

या द्रुतगती महामार्गावरील प्रवास अतिशय वेगवान असणार असून ताशी १२० किमी वेगाने वाहने धावणार आहेत. या द्रुतगती महामार्गामुळे ठाणे आणि नवी मुंबईच्या बाहेरून प्रवासी आणि मालवाहू वाहने विनाअडथळा रायगड जिल्ह्यातील जेएनपीटी बंदरापर्यंत जलदगतीने पोचून देशाच्या निर्यातीस चालना मिळणार आहे. त्याचबरोबर घोडबंदर रोड, ठाणे शहर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, शिळफाटा आणि नवी मुंबई ते पनवेलपर्यंतची अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

९०१ हेक्टर जागांचे संपादन

दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गामधील मुंबई (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) ते बडोदा या दोन मोठय़ा शहरांना जोडणाऱ्या ३७९ किमी लांबीच्या विभागाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. या आठ पदरी मार्गाची पालघर जिल्ह्यातील एकूण लांबी ७८ किमी असून वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यातील ५१ गावांतून हा मार्ग जाणार आहे. यासाठी एकूण ९०१ हेक्टर जागा संपादनाचे काम पूर्ण झाले आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 percent work of mumbai baroda highway completed expressway ysh
First published on: 22-11-2022 at 00:02 IST