Premium

Video : पालघरमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य, आईची वणवण थांबवण्यासाठी मुलाची कमाल; अंगणातच सुरू झाला पाण्याचा झरा, कसं ते पाहा!

आपल्या आईची पाण्यासाठी वणवण पाहून प्रणव साळकर या १४ वर्षीय मुलाला दया आली. आईची ही वणवण थांबावी म्हणून त्याने शक्कल लढवली आहे.

14-year-old Pranav Salkar dug a well in his front yard with the help of his father in palghr sgk 96
पाण्याची वणवण थांबण्यासाठी मुलाने काय शक्कल लढवली? (फोटो – एएनआय)

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य निर्माण झालं आहे. भर उन्हात वणवण भटकून महिलांना डोक्यावरून पाणी आणावं लागतंय. पालघर जिल्ह्यातील केळवे येथील धवांगे पाडा येथेही पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली असून एका कामगार दाम्पत्याच्या मुलाने आईची पाण्यासाठीची वणवण थांबावी म्हणून शक्कल लढवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील अनेक गावात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने गावाबाहेर असलेल्या विहिरीतून पाणी आणावं लागतंय. डोक्यावर सूर्य तळपत असताना पाणी वाहून आणणं महिलांच्या जीवावर बेतणारं आहे. यामुळे महिलांच्या आरोग्याशी हेळसांड होतेय. पालघर जिल्ह्यातील केळवे येथील धवांगे पाडा येथेही पाण्याचं दुर्भिक्ष्य निर्माण झालं असून येथील महिलांनाही हंडाभर पाण्यासाठी उन्हातून वणवण भटकावं लागत आहे. आपल्या आईची ही वणवण पाहून प्रणव साळकर या १४ वर्षीय मुलाला दया आली. आईची ही वणवण थांबावी म्हणून त्याने शक्कल लढवली आणि आपल्या घराच्या अंगणातच विहिर खोदून पाण्याची समस्या मिटवली आहे.

प्रणव साळकरने त्याच्या घराच्या अंगणात छोटासा खड्डा खणला. खड्ड्यात गोडं पाणी असल्याने याला विहिरीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. ही विहिर खोदण्यासाठी त्याला त्याच्या वडिलांनी मदत केली. परंतु विहिर खोदण्याची संकल्पना प्रणवचीच होती. त्यामुळे त्याच्या आईची पाण्यासाठीची दगदग आता थांबली आहे. यामुळे प्रणवचं सर्वत्र कौतुक होतंय.

प्रणवची आई दर्शना साळकर म्हणाल्या की, “या विहिरीमुळे आता चिंता मिटली आहे.” तर, “विहिर खोदण्याकरता मी फक्त दगडं हटवण्यात त्याला मदत केली. बाकी काहीच मदत केली नाही. आता फार छान वाटतंय”, अशी प्रतिक्रिया त्याचे वडिल विनायक साळकर यांनी दिली.

मे महिन्यात अनेक गावांत पाणी टंचाई निर्माण होते. पावसाळा सुरू होईपर्यंत ही समस्या कायम राहते. पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक तलावांत पाण्याने तळ गाठल्याने आता पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 14 year old pranav salkar dug a well in his front yard with the help of his father in palghr sgk