कासा : ग्रामीण, शहरी भागात गरम पाणी हवे असेल तर गॅस, स्टोव्ह किंवा चुलीचा वापर केला जातो. तर काही ठिकाणी विजेवर चालणारे गिझर लावावे लागतात. परंतु डहाणू तालुक्यातील कासा परिसरात चक्क नैसर्गिकरीत्या गरम पाणी ग्रामस्थांना मिळत आहे. येथील एका कूपनलिकेद्वारे गेल्या २० वर्षांपासून २४ तास गरम पाणी मिळत असून त्याचा मनमुराद आनंद येथील ग्रामस्थ घेत आहेत.
कासा परिसरात आचार्य भिसे हायस्कूलजवळ कासा ग्रामपंचायतने सन २००२ मध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी कूपनलिका खोदली होती. या कूपनलिकेतून पिण्याचे पाणी येण्याऐवजी गरम पाणी येऊ लागले आहे. २० वर्षांपासून या कूपनलिकेतून कुठलाही विद्युत पंप नसताना केवळ जमिनीतील पाण्याच्या दाबाने हे गरम पाणी रात्रंदिवस वाहत असते. हिवाळय़ात कासा परिसरातील अनेक नागरिक या गरम पाण्याच्या कूपनलिकेवर आंघोळीसाठी येत असतात.
विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही कूपनलिका खोदलेली आहे, त्या ठिकाणापासून ५० फूट अंतरावर सूर्या नदी वाहते. सूर्या नदीमधून बारमाही थंड पाणी वाहत असताना शेजारीच असलेल्या कूपनलिकेतून गरम पाणी येत असल्याने अनेक नागरिक कुतूहल म्हणूनही या ठिकाणी येत असतात. जमिनीतील या पाण्यामध्ये गंधक हा घटक असल्याने जमिनीमध्ये हे पाणी गरम येते. गरम पाण्याची घनता कमी असल्याने हे पाणी कुठल्याही पंपाशिवाय जमिनीतून बाहेर येत असते. कासा येथे कूपनलिकेतून येणारे गरम पाणी व्यवस्थित वापरता यावे यासाठी या ठिकाणी नळ लावण्यात आले आहेत. कासा परिसरातील ही गरम पाण्याची कूपनलिका आता एक आकर्षणस्थळ बनली आहे.
कासा ग्रामपंचायततर्फे वीस वर्षांपूर्वी या ठिकाणी पाणीपुरवठा होण्यासाठी कूपनलिका खोदण्यात आली होती. तिला गरम पाणी लागल्याने ग्रामस्थ मोठय़ा प्रमाणात आंघोळ करायला येतात. या पाण्यामध्ये गंधक असल्याने हे पाणी गरम होते. तसेच जमिनीखाली पाण्याचा दाब वाढून हे पाणी जमिनीबाहेर येत राहते.
-प्रमोद वारे, प्रा. शिक्षक, भूगर्भ अभ्यासक