35 thousand rickshaw drivers participated in the strike in palghar district zws 70 | Loksatta

रिक्षा बंदमुळे प्रवाशांचे महाहाल; पालघर जिल्ह्यात ३५ हजार रिक्षाचालक संपात सहभागी

रिक्षा बंदच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यत महत्त्वाच्या मार्गांवर प्रवासी व नागरिकांसाठी एसटी बस आधारस्तंभ ठरली.

auto puller
ठाणे स्थानकाबाहेरील बेशिस्त रिक्षाचालकांवर होणार कारवाई (संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

पालघर : पालघर जिल्ह्यातील रिक्षाचालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी रिक्षा बंद आंदोलन केले. सुमारे ३५ हजार रिक्षाचालक या आंदोलनात सहभागी झाले होते. यामुळे माघी गणपतीनिमित्ताने निघालेले भाविक, नोकरदारवर्ग, व्यावसायिक,  विद्यार्थी व नागरिकांचे महाहाल झाले.

रिक्षा प्रवासी भाडय़ात ऑक्टोबर महिन्यात दरवाढ झाल्यानंतर नवीन दरपत्रकानुसार इलेक्ट्रिक मीटरचे पुनप्र्रमाणीकरण (रीकॅलिब्रेशन) करण्याचे परिवहन विभागाने सुचित केले होते. मुंबई महानगर क्षेत्रात एमएमआरटीए प्राधिकरणाने रिक्षाचालकांना प्रथम ३१ ऑक्टोबर व नंतर ३१ डिसेंबर अशी मुदत दिली होती. त्यानंतर १ जानेवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ देताना त्यानंतर प्रतिदिन ५० रुपये दंडआकारणी करण्याचे सूचित केले होते.

पालघर जिल्ह्यात ३५ हजारपेक्षा अधिक तीन व सहा आसनी रिक्षा असून त्यापैकी मुंबई महानगर क्षेत्र असणाऱ्या पालघर व वसई तालुक्यांत २७ हजार रिक्षा आहेत. त्यापैकी अधिकतर रिक्षाने अजूनपर्यंत मीटरचे पुनप्र्रमाणीकरण केले नसल्याचे दिसून आले आहे.  प्रमाणीकरण करण्यासाठी तसेच रिक्षाची दरवर्षांला परमिट पासिंग अर्थास परवाना नूतनीकरण करण्यासाठी विरार येथील आरटीओ कार्यालयात असणाऱ्या ट्रॅकच्या ठिकाणी जावे लागत असते. या सर्व प्रक्रियेत जिल्ह्यातील इतर भागांतील रिक्षाचालकांना त्रासदायक व गैरसोयीचे ठरत आहे. पालघर उमरोळी येथे परिवहन विभागाला देण्यात आलेल्या जागेचा वापर ट्रॅक उभारणीसाठी व्हावा, अशी मागणीदेखील करण्यात आली होती.

एसटी बसचा आधार

पालघर जिल्ह्यत रिक्षा-टॅक्सी बंदची हाक दिल्यानंतर पालघरच्या एसटी विभागाने जिल्ह्यतील प्रत्येक आगाराला जादा एसटी बस सेवा देण्याचे आदेश मंगळवारी संध्याकाळी दिले. त्यानुसार बुधवारी रिक्षा बंदच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यत महत्त्वाच्या मार्गांवर प्रवासी व नागरिकांसाठी एसटी बस आधारस्तंभ ठरली. दररोज रिक्षाने प्रवास करणारम्य़ा प्रवाशांनी एसटीचा आधार घेतला. प्रत्येक मार्गावर एसटी बस  प्रवाशांनी भरल्याचे चित्र पहावयास मिळाले.

निर्णय प्रवाशांच्या हिताचा

या संदर्भात परिवहन विभागाच्या उपप्रादेशिक अधिकारी दशरथ वाघुले यांच्याशी संपर्क साधला असता दरवाढ झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीटरचे पुनप्र्रमाणीकरण करणे हे प्रवाशांच्या हिताचे असल्याचे सांगून एमएमआरटीए घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी परिवहन विभाग करत असल्याचे सांगितले. या कामी रिक्षामालकांना पुरेसा अवधी देण्यात आला असल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

घेराव घालण्याचा इशारा

वसई : परिवहन विभागाने मीटर बदल न करून घेतलेल्या रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय हा अन्यायकारक आहे. पालघर जिल्ह्यात मोठय़ा संख्येने रिक्षा आहेत आतापर्यंत केवळ दोन हजार रिक्षांचे मीटर बदल करून झाले आहेत. त्यामुळे आयुक्तांनी हा निर्णय मागे घ्यावा व मुदतवाढ द्यावी. जर यावर तोडगा निघाला नाही तर मंत्रालयात जाऊन परिवहन आयुक्तांना घेराव घालून आंदोलन करू, असा इशारा रिक्षा चालक-मालक महासंघातर्फे देण्यात आला आहे.

एरवी रिक्षांनी गजबजलेले वसई, नालासोपारा, विरार स्थानकाजवळील व इतर विविध ठिकाणचे रिक्षा थांबे  बुधवारी सर्वत्र ओसाड असल्याचे  दिसून आले आहे. दरम्यान शहरातील रिक्षा बंद असल्याने  सर्वसामान्य नागरिकांना कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचता येत नसल्याने हाल झाले आहेत.  शासनाने रिक्षाचालकांच्या ज्या मागण्या असतील त्या पूर्ण करून प्रवासी वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी शरद जळगावकर या प्रवाशाने केली आहे.

परिवहन विभागाकडून करण्यात येत असलेली दंडाची कारवाई अन्यायकारक आहे. यासाठी ही कारवाई रद्द करावी व आम्हाला मुदतवाढ मिळावी अशी आमची मागणी आहे.

विजय खेतले, अध्यक्ष, रिक्षा चालक-मालक महासंघ

परिवहन विभागाकडून करण्यात येत असलेली दंडाची कारवाई अन्यायकारक आहे. यासाठी ही कारवाई रद्द करावी व आम्हाला मुदत वाढ मिळावी अशी आमची मागणी आहे.

विजय खेतले, अध्यक्ष रिक्षा चालक मालक महासंघ

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 05:28 IST
Next Story
प्रधानमंत्री आवास योजनेतील जाचक अटींमुळे लाभार्थीचे स्वप्न अपूर्णच ; पाच वर्षांत एकही लाभार्थी नाही