आरोग्य कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात ; पालघर जिल्हा परिषदेतील ३५०० कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत

पालघर जिल्हा परिषदअंतर्गत संपूर्ण जिल्ह्य़ात एकूण ४७ प्राथमिक आरोग्य केंद्रे व पाचशेहून अधिक आरोग्य उपकेंद्रे आहेत

वाडा: वर्षभरातील सर्वात मोठा व आनंदाचा सण म्हणून ओळख असलेल्या दिवाळीचा झगमगाट सर्वत्र पाहावयास मिळत असताना पालघर जिल्ह्य़ातील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या घरी शांतता दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ात दिवाळी सण आलेला असतानाही ऑक्टोबर महिन्याचे वेतन आरोग्य कर्मचाऱ्यांना अद्याप मिळाले नाही. त्यामुळे दिवाळी कशी साजरी करायची या चिंतेने कर्मचाऱ्यांना ग्रासले आहे. 

पालघर जिल्हा परिषदअंतर्गत संपूर्ण जिल्ह्य़ात एकूण ४७ प्राथमिक आरोग्य केंद्रे व पाचशेहून अधिक आरोग्य उपकेंद्रे आहेत. या आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य साहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व इतर असे एकूण ३५०० हून अधिक कर्मचारी सेवेत कार्यरत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांचा ऑक्टोबर महिन्याचा पगार अद्याप झालेला नाही. दर महिन्याच्या १ तारखेला कर्मचाऱ्यांचे वेतन होत असते; परंतु नोव्हेंबरची ३ तारीख ओलांडूनही ऑक्टोबर महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. 

करोनाच्या निर्बंधामुळे गतवर्षीची दिवाळी साजरी करता आली नाही; परंतु यंदा निर्बंध मोठय़ा प्रमाणात शिथिल करण्यात आल्यामुळे दिवाळीचा उत्साह वाढला आहे. नोव्हेंबर महिन्याचा पहिल्याच आठवडय़ात दिवाळीचा उत्सव सुरू झालेला आहे. शासकीय, निमशासकीय तसेच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही ऑक्टोबर महिन्याचे वेतनही झालेले आहे. त्यांची दिवाळीची खरेदीही सुरू झालेली आहे. बाजारात खरेदीचा उत्साह पाहायला मिळत आहेत. घरोघरी दिवाळीची तयारीही सुरू आहे; परंतु आरोग्य कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन न मिळाल्याने या उत्साहाचा आनंद तरी कसा घ्यायचा, असा प्रश्न त्यांना पडला आहे. 

या वर्षी दिवाळी सण नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ात आल्याने  प्रशासनातील विविध विभागांत तसेच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे महिन्याच्या ७, १० तारखेला होणारे वेतन १ तारखेलाच झाले आहे. वेतन झालेल्या अन्य कर्मचारी तसेच कामगारांची खरेदीसाठी झुंबड उडालेली असताना पालघर जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील कर्मचारी मात्र दिवाळी खरेदीपासून वंचित राहिले आहेत. राज्यातील अन्य जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन मिळाले आहे. फक्त पालघर जिल्ह्य़ातील कर्मचारी या वेतनापासून वंचित राहिले आहेत.

दरम्यान याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी  बुधवारी (३ ऑक्टोबर) संध्याकाळी उशिरापर्यंत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर वेतन जमा होईल, असे सांगितले. परंतु रात्री उशिरापर्यंत वेतन  जमा न झाल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.

उसनवारीत दिवाळी साजरी करण्याची वेळ

गुरुवारी लक्ष्मीपूजनाची बँकेला सुटी आहे. वेतन जरी बुधवारी सायंकाळी  जमा झाले तरी ते गुरुवारच्या सुटीमुळे काढता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. एटीएम कार्डने पैसे काढण्याची सुविधा असली तरी अनेकांकडे एटीएम कार्ड नाही. ज्यांच्याकडे असले तरी दिवाळीच्या दिवसांत एटीएम केंद्रात खर्चाला पैसे उपलब्ध होतील याची शाश्वती नाही. वेतनच झाले नाही तर कुटुंबाच्या उत्साहावर विरजण पडू नये यासाठी उसनवारीला सामोरे जावे लागण्याची वेळ येईल, अशी खंतही कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. पैसेच नसल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या घरात अजूनपर्यंत कुठलीच खरेदी झाली नसल्याचे आरोग्य विभागातील अनेक कर्मचाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पालघर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 3500 employees of palghar zilla parishad waiting for their salaries zws

ताज्या बातम्या