बोईसर / कासा : मुंबई-बडोदा राष्ट्रीय द्रुतगती महामार्गाचे काम सध्या पालघर जिल्ह्यात सुरू आहे. डहाणू तालुक्यातील गंजाड ते तलासरीपर्यंत डोंगर सपाटीच्या कामात गंजाड ग्रामपंचायत हद्दीतील नवनाथ कोहराळी पाडा येथे प्रचंड क्षमतेचे भूसुरुंग स्फोट केले जात आहेत. या स्फोटात उडालेले भले मोठे दगड थेट येथील ग्रामस्थांच्या घरांवर पडून घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे ४० पेक्षा अधिक घरे यामध्ये बाधित झाली आहेत.
मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास भूसुरुंग स्फोटाने कोहराळी पाडा हादरला होता. सुदैवाने या पाडय़ातील ग्रामस्थ हे दिवसा आपल्या शेतीच्या कामानिमित्त घरांबाहेर असल्याने तसेच लहान मुले शाळेत गेली असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरांत असलेल्या वृद्ध ग्रामस्थांची भीतीने पळापळ झाली. घरांवर पडलेल्या दगडांमुळे घरांचे पत्रे आणि कौले फुटून घराच्या आतमधील टीव्ही, कपाट, फॅन, भांडी आणि इतर साहित्यांचे मोठं नुकसान झाले आहे.
उडालेले दगड वीज वाहिन्यांवर पडल्याने वीज तारा तुटून संपूर्ण पाडय़ातील वीजपुरवठा ठप्प झाला आहे. घरांचे मोठ नुकसान झाल्यामुळे कोहराळी पाडय़ातील आदिवासी कुटुंबांमध्ये घबराट पसरली आहे. जोपर्यंत झालेल्या नुकसानीची संपूर्ण भरपाई मिळत नाही तसेच ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल करून जोपर्यंत सुरक्षेची हमी मिळत नाही तोपर्यंत काम सुरू करून देणार नसल्याचा पवित्रा येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. डहाणू तालुका हा पर्यावरणीयदृष्टय़ा अतिसंवेदनशील असल्याने तालुक्यात दगडखाणींना बंदी आहे, मात्र मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्ग हा केंद्राचा प्रमुख पायाभूत प्रकल्प असल्याने या कामासाठी भूसुरुंग स्फोटाची काही नियमांच्या चौकटीत परवानगी देण्यात आली आहे. त्याचा गैरफायदा सध्या आर. के. सी. इन्फ्रा या ठेकेदार कंपनीकडून घेतला जात आहे, असा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. या सगळय़ात येथील गरीब आदिवासींचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून या महामार्गाच्या भूसंपादनात सक्षम अधिकारी असलेल्या डहाणूच्या साहाय्यक जिल्हाधिकारी संजीता मोहपात्र या कंपनीवर नेमकी काय कारवाई करतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
मागणीकडे दुर्लक्ष
डोंगर फोडण्यासाठी भूसुरुंग स्फोट केल्यास १०० मीटर अंतरावरील येथील घरांना धोका असल्याचे याआधीच कोहराळी ग्रामस्थांनी गंजाड ग्रामपंचायतीला पत्राद्वारे कळवले होते. त्यामुळे या भागात भूसुरुंग स्फोटांना परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र ग्रामपंचायतकडून या सगळय़ाकडे कानाडोळा केल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतो. तर नुकसान झालेल्या घरांची पाहणी करून अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवल्याचे सांगत ग्रामविकास अधिकाऱ्यांनी या सगळय़ातून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
नवनाथ गावात भूसुरुंग स्फोटाने काही घरांचे मोठे नुकसान झाले असून घरांचे पंचनामे मंडळ अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आले आहेत. त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात येणार आहे.
-अभिजित देशमुख, तहसीलदार, डहाणू.