कुणाल लाडे डहाणू : मुंबईतील गणेशोत्सवाचा जल्लोष हे पर्यटकांचे आकर्षण केंद्र नेहमीच राहिले आहे. मात्र, आता या आकर्षणाचे रूपांतर समूह सहलींमध्ये झाले आहे. महाराष्ट्रानजीकच्या गुजरातमधून गणेशोत्सवाच्या काळात दररोज ६० ते ८० खासगी बसमधून शेकडो भाविक केवळ ‘लालबागचा राजा’ आणि मुंबईतील अन्य महत्त्वाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी येत असल्याचे दिसून आले आहे. अवघ्या २४ तासांच्या या समूहसहलींमध्ये गणेश दर्शनासह मुंबईचे धावते पर्यटनही उरकले जात आहे. गुजरातमधून येणाऱ्या भाविकांची संख्या करोना काळानंतर लक्षणीय प्रमाणात वाढली असल्याचे निरीक्षण पालघर जिल्ह्यातील वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे. विशेष म्हणजे, त्याला समूहसहलींचे स्वरूपही लाभू लागले आहे. या सहलींमधून छोटय़ा-मोठय़ा आरामबस तसेच खासगी वाहनांतून शेकडो भाविक जेमतेम एका दिवसासाठी मुंबईची सफर करून परततात. वापी, सिल्वासा, दमण, चिखली, वलसाड, नवसारी आणि सुरत या भागांतून येणाऱ्या भविकांची संख्या जास्त आहे. खासगी टूर एजन्सीच्या मार्फत या सहलींसाठी माणशी एक ते दीड हजार रुपये शुल्क आकारण्यात येते. याशिवाय कौटुंबिक किंवा मित्रमंडळींचा समूह बनवून त्याद्वारे बस भाडेतत्वावर घेऊन गणेश दर्शनासाठी मुंबई गाठण्याकडेही कल आहे. याखेरीज गुजरातमधील काही राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांकडूनही अशा प्रकारच्या सहली प्रायोजित केल्या जात असल्याचे दिसले आहे. गुजरात ते मुंबई..२४ तासांत या सहलींअंतर्गत रात्री उशिरा किंवा मध्यरात्रीनंतर गुजरातमधील वेगवेगळय़ा भागांतून बस मुंबईच्या दिशेने रवाना होतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वप्रथम भाविकांना ‘लालबागचा राजा’चे मुखदर्शन घडवले जाते. त्यानंतर पूर्वनिश्चितीप्रमाणे अन्य महत्त्वाच्या गणेशांचे दर्शन घेतले जाते. तेथून भाविकांच्या आवडी-सवडीप्रमाणे गेटवे ऑफ इंडियासह मुंबईतील अन्य महत्त्वाच्या पर्यटनस्थळांची धावती सफर घडवून या बस परतीच्या वाटेला लागतात. तेथून परतताना विरारमधील श्री जीवदानी आणि डहाणू तालुक्यातील श्री महालक्ष्मी मंदिर येथे आवर्जून बस थांबा घेतला जातो. अशा प्रकारे जेमतेम २४ तासांत हे दर्शन आटोपले जाते. महामार्गावर गजबज, कोंडी गेल्या सात-आठ दिवसांत गुजरातमधून केवळ गणेश दर्शनाच्या निमित्ताने येणाऱ्या बसची संख्या पाचशेच्या घरात असल्याचे समजते. या बसगाडय़ा मध्यरात्री एकाच वेळेस निघत असल्याने त्यांच्या लोंढय़ामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दापचरी सीमा तपासणी नाक्यासह अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळते. त्याचवेळी महामार्गावर वाढलेल्या वर्दळीचा महामार्गालगत असलेल्या हॉटेल आणि ढाब्यांनाही आर्थिक फायदा होऊ लागला आहे. मुंबईत समन्वयकांची नेमणूक मुंबईतील गणपतींचे दर्शन तसेच पार्किंगची सुविधा व्यवस्थित पार पडावी, यासाठी टूर व्यावसायिकांनी मुंबईत समन्वयकांची नेमणूकही केली आहे. हे समन्वयक बसचालकांशी संपर्क साधून मुंबईतील सहलींचे नियोजन करतात. या बदल्यात त्यांना चांगले कमिशन मिळते, अशी माहिती एका बसचालकाने दिली.