आदिवासी कुळांच्या जमिनीची विक्री करून त्यांच्या नावे स्वतंत्र ७/१२ उतारा घडवण्यासाठी पालघर तहसील कार्यालयाने पुढाकार घेतला असून या प्रकरणात दाखल झालेल्या ७० दाव्यांमधील १२० कुटुंबातील ४०० व्यक्तींच्या नावे सुमारे १५० एकर जमिनीची स्वतंत्र ७/१२ उतारा नोंदणी त्यांच्या वैयक्तिक नावे करण्याची प्रकिया राबविण्यात येत आहे. यामुळे विविध राष्ट्रीय प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱ्या आदिवासी बांधवांना त्यांचा जमिनीचा पूर्ण मोबदला मिळण्याचा मार्ग खुला होणार आहे.
पालघर जिल्ह्यात अनेक दुर्गम भागात आदिवासी बांधवांची ७/१२ उताऱ्या वर कुळ म्हणून नोंदी असून त्यांची विक्री करून घेण्याची प्रक्रिया राबविणे त्यांना शक्य नसल्याचे जाणवल्यानंतर पालघरची तहसीलदार सुनील शिंदे यांनी या प्रकरणात विशेष मोहीम हाती घेतली आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या मदतीने कुळांच्या वतीने दावे तयार करून शेतजमीन न्यायाधिकरण कलम ३२-ग अंतर्गत कुळाची विक्री करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.
संबंधित गावचा तलाठ्याने अशा जागां संदर्भातील माहिती संकलित करून आदिवासी खातेदारांच्या नावे दावा तयार केले. या दाव्यांसोबत लागणारे जुने ७/१२ उतारा व फेरफार सोबत जोडून अशी ९८ प्रकरणे शेतजमीन न्यायाधिकरण अर्थात तहसीलदार कार्यालयात सादर केली. या प्रकरणात १३ मार्च रोजी तहसील कार्यालयात सुनावणी होऊन संबंधित कुळ पक्षकारांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. याप्रसंगी ७० कुळ मालकांनी आपली बाजू सुनावणी दरम्यान तहसील कार्यालयात सादर केली. यानंतर महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ अन्वये त्यावर प्रक्रिया करून कुळांचे विक्री आदेश तयार करण्यात आले आहेत. या जमिनीच्या विक्रीसाठी लागणारे निधी संबंधित कुळांकडून भरून घेऊन जमिनीचे ७/१२ उतारा त्यांच्या नावे करण्याची प्रक्रिया येत्या काही दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
शासकीय प्रकल्पांसाठी जमीन अधिग्रहणात किंवा जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात कोणाला ६० टक्के तर जमीन मालकांना ४० टक्के अशा प्रमाणात सामंजस्याने व्यवहार करण्यात येत आहे. मात्र आगामी काळात पालघर तालुक्यातील सुमारे ४०० आदिवासी व्यक्तींची नावे जमिनीची मालकी मिळणार असल्याने त्याला पुढील व्यवहारात अथवा जमीन स्वतःच्या नावे असल्याने सुविधा व सुलभता राहणार आहे. पालघर तहसीलदार तसेच महसूल विभागाने हाती घेतलेल्या या उपक्रमा बद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
उपक्रमात समाविष्ट सजा: दहिसर तर्फे मनोर, ढेकळे, सातिवली, दुर्वेस, मनोर, लालोंडे, चहाडे, तांदुळवाडी, माहीम, पारगाव, गोवाडे, किराट, वेळगाव, शिगाव, नांदगाव तर्फे मनोर, तारापूर, पडघे, नानिवली