पालघर जिल्ह्यातील बोईसर रेल्वे स्थानकातून एका रेल्वे मजूर महिलेच्या आठ महिन्याच्या चिमुकलीचं अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित चिमुकली झोळीत झोपली असताना तिचं अपहरण करण्यात आलं या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पालघर लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या आठ तासात अपहरणकर्त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी आरोपीच्या तावडीतून चिमुकलीची सुटका केली आहे. चिमुकली सध्या सुखरुप असून तिला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिलं आहे. या घटनेचा पुढील तपास पालघर लोहमार्ग पोलीस करत आहेत.

वर्षा कन्हैया डामोर असं फिर्यादी रेल्वे मजूर महिलेचं नाव आहे. तर महिमा असं अपहरण झालेल्या चिमुकलीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वर्षा व तिचे पती कन्हैया दोघंही रेल्वे मजूर आहेत. दोघंही रेल्वे रुळावर काम करत असल्याने त्यांनी आपल्या आठ महिन्याच्या चिमुकलीला बोईसर रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाखाली झोळीत झोपवलं होतं. चिमुकली झोपल्यानंतर डामोर दाम्पत्य कामावर निघून गेलं होत. दरम्यान साडे अकराच्या सुमारास अज्ञातानं चिमुकलीचं अपहरण केलं.

८ महिन्याची महिमा झोळीत नसल्याचं सर्वप्रथम फिर्यादी वर्षा डामोर यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकारी महिलेच्या लक्षात आलं. त्यांनी त्वरित याची माहिती बाळाची आई वर्षा यांना दिली. झोळीतील बाळ गायब झाल्याचं पाहून वर्षा यांनी टाहोच फोडला. चिमुकलीचं अपहरण झाल्याचं लक्षात येताच, त्यांनी तातडीनं बोईसर लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. याठिकाणी वर्षा यांनी अज्ञाताने बाळाला पळवून नेल्याची फिर्याद दाखल केली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल केला.

पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी नरेश रणधीर यांनी तातडीनं तपासाची चक्रे फिरवली. त्यांनी अपहरणाची माहिती रेल्वे स्थानकावर हजर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह गृहरक्षक दलाच्या जवानांना दिली. दरम्यान मुरबे येथून रेल्वे स्थानकाकडे कामासाठी जाणारे गृहरक्षक दलाचे जवान योगेश तरे यांनी एक व्यक्तीला बाळाला घेऊन जाताना पाहिलं. त्यांनी त्वरित बाळाचा फोटो काढून पोलीस ठाण्यात पाठवला. बाळाच्या आईनं हे बाळ आपलंच असल्याचं सांगताच पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बल पाठवून आरोपीला पकडलं. अवघ्या आठ तासात ही कारवाई करण्यात आली. आरोपीला पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणलं असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. पोलीस अधिकारी नरेश रणधीर यांनी बाळाला आई-वडिलांच्या ताब्यात दिलं आहे.