पालघर : जिल्ह्याच्या नियोजन विभाग अंतर्गत आदिवासी विकास योजनेमधून रस्ता दुरुस्तीसाठी सर्वसाधारणपणे दरवर्षी २५ ते ३० कोटी रुपये उपलब्ध होत असताना आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत रस्ते व पूल दुरुस्ती व सुधारणांच्या ६५१ कामांकरता जिल्हा परिषदेस ८६ कोटी रुपयांचा निधी आदिवासी विकास विभागामार्फत मंजूर करण्यात आला आहे. यापैकी जिल्हा परिषदेकडे ४६ कोटी रुपये प्राप्त झाले असून उर्वरित रक्कम आगामी काळात शासनाकडून मिळणार आहे.
राज्य शासनाकडे उपलब्ध निधीमधून आदिवासी उपयोजना क्षेत्र, अतिरिक्त आदिवासी उपयोजना, माडा क्षेत्र, मिनी माडा क्षेत्र यामधील कामे मंजूर करण्यात आलेली आहेत. दरम्यान पालघर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत अंदाजे १८०० कामांकरिता सुमारे १९५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. दरम्यान मंजूर कामे सन २०२२-२३ या वित्तीय वर्षांमध्ये पूर्ण करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेने केले असून रस्ते सुधारणांची कामे पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण आदिवासी भागातील दळणवळण व वाहतूक व्यवस्थेमध्ये सुलभता येणार आहे.
शासनामार्फत मंजूर करण्यात आलेल्या ६५१ रस्त्यांच्या कामांपैकी २४० कामे ही ग्रामीण मार्गाची असून १४३ कामे ही इतर जिल्हा मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग या दर्जाची आहेत. तसेच मंजूर झालेल्यांपैकी ४१ कामे ही पर्यटनस्थळे व यात्रास्थळे यांना जोडणाऱ्या रस्त्यांची असून २२७ कामे ही गाव, वाडे व पाडे यांना मुख्य रस्त्यांशी जोडणाऱ्या रस्त्यांची आहेत, त्यामुळे अतिदुर्गम भागातील लोकवस्तीसाठी ही कामे अत्यंत महत्त्वाची आहेत.
सन २०२२-२३ मध्ये या लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर ६५१ रस्त्यांच्या कामांव्यतिरिक्त शासकीय जिल्हा नियोजन समिती व जिल्हा परिषदस्तरीय इतर तरतुदीमधूनदेखील रस्ते बांधणी, रस्ते नूतनीकरण, रस्ते, पूल, मो-या सुधारणा इत्यादी प्रकारची व महत्त्वाची कामे प्रस्तावित करून पालघर जिल्हयाकरिता अधिकाधिक निधी उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. सन २०२२-२३ या वित्तीय वर्षांअखेरपर्यत जिल्हयातील सर्व महत्त्वाची रस्त्यांची सुधारणा करणे, जिल्हयातील सर्व पर्यटनस्थळे व यात्रास्थळांना जोडणारे रस्ते तयार करणे तसेच सर्व वाडे, पाडे महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणेचे उद्दिष्ट पालघर जिल्हा परिषदेने निश्चित केले आहे. निधी उपलब्ध करून घेण्यास पालकमंत्री, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व अधिकारी वर्गाचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.
निधीचे वितरण ,

तालुका कामे निधी (लाखांत)
विक्रमगड: २०१ २६२५
जव्हार: ९९ १३६५
वाडा: १५० १८५०
मोखाडा: ९८ १७३०
डहाणू: ३८ ३८०
पालघर: ६५ ६५०
एकूण: ६५१ ८६००