पालघर: पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत मेल आयडीवर आल्याने त्याची पडताळणी करून जिल्हा मुख्यालय संकुलातील प्रमुख इमारती रिकामी करण्यात आल्या. बॉम्ब शोधक पथक व पोलिसांकडून संकुलांची तपासणी करण्यात आली. मात्र ही धमकावणी फसवी असल्याचे नंतर सायंकाळी निष्पन्न झाले.
पालघर जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत ई-मेल वर आज सकाळी ६.२३ वाजता आकाश भास्करन डीएमके-केविनकेअर यांच्या ईमेल वरून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आरडीएक्स अधिष्ठित सुधारित स्फोटक यंत्र (improvised explosive device आयइडी) बॉम्ब गुप्तपणे ठेवण्यात आलेला असल्याचे नमूद केले होते. या बॉम्बचा सायंकाळी ४.३० वाजता स्फोट होणार असल्याची माहिती या ई-मेल मध्ये नमूद होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात गुप्तरित्या ठेवलेला बॉम्ब दुपारी ३.३० वाजता सक्रिय करण्यात येणार असल्याचे देखील या ईमेल मध्ये नमूद करण्यात आले होते.
याबाबतची माहिती पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयात सकाळी ११.३० सुमारास देण्यात आली. या ई-मेलची पडताळणी करण्याचे काम एकीकडे सुरू असताना पालघर पोलीस व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा मुख्यालय संकुलातील प्रशासकीय अ व प्रशासकीय ब या इमारतीमधील सर्व कार्यालय दुपारी १२ वाजल्याच्या सुमारास रिकामी करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत अ व ब अशा तिन्ही इमारतींतील सर्व खोल्यांची बॉम्ब शोधक व श्वान पथकाकडून कसून तपासणी करण्यात आली. तसेच १० मेटल डिटेक्टर मशीनद्वारे संकुलाच्या परिसरातची देखील तपासणी करण्यात आली. तपासणी पूर्ण झाल्यावर दुपारी २.३० वाजता सर्व शोधपथकांना बाहेर पडले. या तपासात काहीही संशयास्पद न आढळल्याने सर्व कार्यालय बंद करून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. दरम्यान धमकावणीच्या ईमेलची सत्यता आणि पडताळणी विश्वसनीय सूत्रांकडून केल्यानंतर (क्लासिफाईड इंटेलिजन्स) यावर पोलिसांनी आवश्यक शोध मोहीम व उपाययोजना आखल्या.
बॉम्बस्फोटाची वेळ दुपारी उशिराची दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सर्व इमारतींच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. जलद प्रतिसाद पथक (क्यूआरटी), बॉम्बशोधक आणि निकामी पथक (बीडीटीएस) व दंगल नियंत्रण पथक (आरसीएफ) चे जवळपास २०० कर्मचारी कार्यरत होते. या इमारतीच्या ठिकाणी एनडीआरएफला देखील पाचरण करण्यात आले असून संपूर्ण जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अग्निशमन दल व आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिका देखील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.
जिल्हा संकुलातील इमारती रिकामी करायला घेतल्यानंतर हा एक मॉक ड्रिल (आपत्कालीन परिस्थितीचे रंगीत तालीम) चा प्रकार असावा असे प्रथमतः वर्तवण्यात येत होते. मात्र निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी आपल्या कार्यालयात ई-मेल आल्याचा दुजोरा दिल्यानंतर या प्रकरणातील गांभीर्य वाढले. सावधगिरीचा इशारा तसेच आपत्कालीन परिस्थितीच्या आराखड्यानुसार आवश्यक ती पावले उचलली जात असून पालघर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा व इतर संबंधित यंत्रणा सतर्क करण्यात आल्याची माहिती पोलीस तसेच जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा असल्याचे सायंकाळी पाच वाजल्यानंतर निष्पन्न झाले. त्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात जाण्याची मुभा देण्यात आली. ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीच्या तसेच पद्धतीचा पोलीस तसेच सायबर सेल यांच्यामार्फत तपास सुरू झाला असून या कामी राज्य सायबर सेल शाखेची मदत घेतली जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला अशा प्रकारे बॉम्ब ठेवल्याची धमकावणी का देण्यात आली. यामागील कारणांचा देखील पोलीस तपास करत असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
पत्रकार परिषद रद्द
पालघर पोलिसांनी तारापूर येथील एका गंभीर गुन्ह्याच्या तपासात मिळवलेल्या यशा संदर्भात आज दुपारी बारा वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अचानकपणे ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. पत्रकार परिषद रद्द करताना कोणतेही कारण देण्यात आले नव्हते. मात्र जिल्हा मुख्यालय संकुलात ई-मेल आल्याच्या कारणांवरून पत्रकार परिषद रद्द केल्याचे पोलीस अधीक्षक यांनी नंतर दुजोरा दिला.