साडेसहा लाख नवीन बारदानांची परस्पर विक्री; सुमारे तीन कोटींचा गैरव्यवहार

नीरज राऊत

पालघर: पालघर व ठाणे जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळातर्फे राबवल्या जाणाऱ्या २०२०-२१ मधील आधारभूत भातखरेदी योजनेत भात वाहतुकीमध्ये आणि धान खरेदीमध्ये गैरप्रकार झाल्याचे आरोप झाल्याचे प्रकरण ताजे असताना यंदाच्या वर्षी बारदान वितरणातदेखील किमान तीन कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

सन २०२०-२१ या आर्थिक वर्षांत पालघर, ठाणे व रायगड या तीन जिल्ह्यांमध्ये सहा लाख ६८ हजार ८१६ क्विंटल भाताची आधारभूत केंद्रांवर खरेदी झाली आहे.  त्यापैकी चार लाख ४१ हजार ३८ क्विंटल भाताची भरडाई झाली आहे. त्यापैकी दोन लाख ९५ हजार ४९५ क्विंटल तांदूळ प्राप्त झाला असून त्यातील दोन लाख ६० हजार ३३२ क्विंटल तांदूळ तालुका गोदामांमध्ये पोहोचवण्यात आला आहे. यामध्ये पालघर जिल्ह्यातील एक लाख ७४ हजार तर ठाणे जिल्ह्यातील एक लाख २१ हजार क्विंटल तांदळाचा समावेश आहे. पालघर व ठाणे जिल्ह्यात एकंदर ३७ गिरण्यांमध्ये भरडाईचे काम केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

भात खरेदी केंद्रांवर शेतकरी त्यांच्या जुन्या बारदानामधून भात जमा करत असतो. शेतकऱ्यांना जमा होणाऱ्या बारदानाचा मोबदला शासन शेतकऱ्यांना अदा करित असते. मात्र या खरेदी केंद्रातून भरडाईला भात जाताना त्यापासून उत्पादित होणाऱ्या तांदळाला नवीन बारदानामध्ये भरणे अपेक्षित असते. भरडाई झालेल्या तांदूळ भरण्यासाठी यंदा सुमारे सात लाख नवीन बारदानांची खरेदीही झाली होती. परंतु त्यांची आदिवासी विकास महामंडळाच्या काही अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने परस्पर विक्री केल्याचे सांगण्यात येते. ठाणे व पालघर जिल्ह्याच्या भागांमध्ये साडेसहा लाख नवीन बारदान पुरवठा करणे आदिवासी विकास महामंडळाला आवश्यक असताना यापैकी बहुतांश बारदान परस्पर विक्री केल्याने कोटय़वधी रुपयांचा घोटाळा पुढे आला आहे. जिल्ह्यतील कोणत्याही केंद्रावर तपासणी केल्यास तेथे नवीन बारदानामध्ये धान (भात) आढळून येत नसून फक्त कागदावरच नवीन बारदानाच्या नोंदी आहेत. प्रत्यक्षात शासनाला काळविलेल्या बारदानाच्या आकडय़ापेक्षा २० टक्के बारदान केंद्रावर उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे ठाणे व पालघर जिल्ह्यातील गिरण्यांना नवीन बारदान नसल्याने उरलेल्या भाताची भरडाई स्थानिक पातळीवर न देता जळगाव आणि औरंगाबाद या दूरच्या ठिकाणी असलेल्या गिरण्यांना भरडाईचे काम देण्याचा घाट घातला असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शासनाचे वाहतुकीपोटी  दीड कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च होणार आहे, असे सांगितले जात आहे.

धमकावण्याचा प्रकार नवीन बारदानाची किंमत ६४ रुपये प्रति नग इतकी आहे. त्यांची  परस्पर बाजारात विक्री करण्यात आली आहे. अशी सुमारे साडे सहा लाख नवीन बारदाने आहेत. ती विक्री केल्यामुळे २० ते २५ रुपये किमतीला उपलब्ध जुन्या बारदानात तांदूळ भरण्याची नामुष्की गिरणीमालकांवर ओढवली आहे. झालेला गैरप्रकार उघडकीस येऊ नये म्हणून केंद्र व गिरणी चालकांना नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगून कारवाईचा धाक अधिकाऱ्यांकडून दाखविला जात आहे. त्यामुळे कारवाई होऊ नये या भीतीपोटी  नवीन बारदान प्राप्त झाले नसतानाही ते प्राप्त झाल्याच्या स्वाक्षऱ्या घेण्याची वेळ काही खरेदी केंद्र आणि गिरणी चालकांवर आली आहे. बारदान खरेदीमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप आदिवासी एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष जनाठे यांनी केले असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.