निखिल मेस्त्री
पालघर: शोषखड्डय़ांमुळे डहाणू, पालघर तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे शोषखड्डे तयार करताना त्याचे नियोजन चुकल्यामुळे येथील जलस्रोत दूषित होऊ लागले आहेत. दैनंदिन जीवनात विहिरी, विंधन विहिरीपासून मिळणाऱ्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.
डहाणू, पालघर या तालुक्याच्या समुद्रकिनारपट्टीलगत असलेल्या गावांमध्ये दाटीवाटीच्या वस्त्या व घरे आहेत. या ठिकाणी वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय बांधण्याची योजना अमलात आणली. त्यानुसार ग्रामपंचायतनिहाय आराखडा तयार करून ज्यांच्याकडे शौचालय नाहीत अशा सर्वाना शौचालय देण्याची योजना राबवली गेली. ती राबवताना शौचालयातील मलिद्याचा खत म्हणून उपयोग व सांडपाणी जमिनीत पुनर्भरण व्हावे यासाठी शोषखड्डे तयार करण्याचे तंत्रज्ञान वापरले गेले. मात्र हे तंत्रज्ञान फोल ठरले आहे.
जमिनीत पाण्याचे पुनर्भरण होत असताना शोषखड्डय़ातील सांडपाणी आजूबाजूच्या परिसरात असलेल्या जलस्रोतांमध्ये जाऊन मिसळत असल्यामुळे हे पाणी दूषित होऊ लागले आहेत. त्यामुळे हे पाणी प्यायल्यास किंवा वापरल्यास नागरिकांना त्वचारोग, पोटाचे विकार बळावण्याची शक्यता वर्तवली जाते.
किनारपट्टी भागांसह बोईसरसारख्या इतर मोठय़ा ग्रामपंचायतीमध्ये दाटीवाटीच्या ठिकाणी हीच परिस्थिती आढळून येते. शोषखड्डे पाझरल्यानंतर कालांतराने नजीकच्या पाणी स्रोतांचे चांगले पाणी प्रदूषित होत आहे. त्यामुळे शोषखड्डय़ाचे नियोजन चुकीचे असल्याचे सांगितले जाते. ज्या भागांमध्ये पिण्यासाठी पाण्याची उपलब्धता कमी आहे.
त्या ठिकाणी उपलब्ध जलस्रोतांवर नागरिक अवलंबून असतात. अशा वेळी हे पाणी साठे दूषित झाले, तर आरोग्याला हानी पोहोचण्याची दाट शक्यता आहे. ही चिंतेची बाब असल्याचे काही लोकप्रतिनिधींमार्फत सांगण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत झालेल्या एका बैठकीमध्ये एका लोकप्रतिनिधीने ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आजतागायत उपाययोजना झालेली नाही.
जमिनीच्या जलद शोषण क्षमतेचा परिणाम
किनाऱ्याजवळ असणाऱ्या गावांमध्ये व परिसरामध्ये १५ ते ३० फूट खोलीवर पाणी स्रोत उपलब्ध होतात. तसेच तेथील जमिनीची लवकर पाणी शोषून घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे शोषखड्डे यातील पाणी लवकर मुरते व भूगर्भातील झऱ्यांसोबत ते लगतच्या पाणी स्रोतांमध्ये मिसळते. त्यामुळे दुर्गंधीयुक्त व प्रदूषित पाणी आढळते, असे काही ग्रामस्थांनी म्हटले आहे.
नियमानुसार शोषखड्डे लाभदायक
शोषखड्डे आणि हातपंप, विहीर, नदी, तलाव आदी जलस्रोत यामध्ये विशिष्ट सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक आहे. मात्र दाटीवाटीने वस्ती असलेल्या ठिकाणी याबाबत मार्गदर्शन मिळत नाही. शौचालय आणि भूजल स्रोत यांच्यातील सुरक्षित अंतर ४० फूट आहे. जर पाण्याची पातळी जमिनीच्या पातळीपेक्षा १२ फूट खाली असेल तर ते अंतर १० फूट कमी करता येते. कोणत्याही परिस्थितीत हे अंतर १० फुटांपेक्षा कमी असू शकत नाही. हे अंतर जमिनीतील रोगजनकांच्या प्रवासावर अवलंबून असते. हा प्रवास बारीक मातीमध्ये हळू आणि खडबडीत माती किंवा मुरुममध्ये जलद असतो.तसेच उताराच्या जमिनीमध्येही हा प्रवास जलद असतो. त्यामुळे शौचालय बनताना या बाबीही लक्षात घ्यायला हव्यात, असे नियम सांगतो.
शोषखड्डे हे उपयुक्त असले तरी दाटीवाटीच्या वस्त्यांसाठी व विशेषत: किनाऱ्यालगतच्या गावांच्या आरोग्यासाठी घातक व मानवी जीवनावर दुष्परिणाम करणारे आहेत. त्यामुळे प्रशासनाने पर्याय शोधणे आवश्यक आहे. – सचिन वर्तक, उपसरपंच, एडवण ग्रामपंचायत
अशा समस्या निर्माण होणाऱ्या गावांमध्ये किंवा परिसरामधील पाणी स्रोतांचे पाणी नमुने तपासणी करून घेतले जातील. पुढील अहवाल आल्यानंतर किंवा स्रोत दूषित आढळल्यास तातडीने उपाययोजना आखल्या जातील. – अतुल पारसकर, विभाग प्रमुख, स्वच्छ भारत मिशन, जिल्हा पालघर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Absorption endangers health contaminated water sources dahanu palghar talukas amy
First published on: 19-05-2022 at 00:03 IST