राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी; शिवसेनेचे सदस्य अज्ञातस्थळी

पालघर जिल्हा परिषद निवडणूक

पालघर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच तीन विषय समिती सभापती पदांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्य़ातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा सदस्यांसह काँग्रेसच्या एका सदस्याने स्वतंत्र गट बनविला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलतील या भीतीने शिवसेनेने त्यांच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांना अज्ञातस्थळी हलविले आहे.

जिल्हा परिषदेच्या जानेवारी २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ सदस्य निवडून आले होते. या पक्षाच्या सदस्यांचे गटनेते नरेश आक्रे यांचे सदस्यत्व ओबीसी आरक्षणाच्या मुद्दय़ावर रद्द झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या उर्वरित आठ सदस्यांच्या नव्याने गट नोंदणी करणे व गट नेता निवडणे आवश्यक झाले होते.  १२ जुलै रोजी राष्ट्रवादीच्या सहा व काँग्रेसच्या एक सदस्याने स्वतंत्र गट स्थापनेच्या मान्यतेसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता. मात्र जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ हे १२ व १३ जुलै रोजी जिल्ह्य़ाबाहेर कामानिमित्ताने असल्याने नवीन गट स्थापन करण्यासाठी १४ जुलै रोजी येण्यास सांगितले होते. ही मंडळी १४ जुलै रोजी दिवसभर कार्यालयात होती. मात्र त्यांची जिल्हाधिकारी यांच्याशी भेट होऊ शकली नाही.

बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी हे त्यांच्या गैरहजेरीत सात सदस्य त्यांच्या दालनात गट स्थापनेसाठी १५ जुलै रोजीचे पत्र तयार करीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आमदार सुनील भुसारा व माजी बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी हे जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये शिरले आणि दादागिरी व अर्वाच्य भाषेत या सदस्यांना जाब विचारला.  पुढे नवीन गटात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या एका महिला सदस्यालाही खेचून बाहेर काढण्याचा देखील प्रयत्न केल्याची माहिती पुढे आली आहे. काही वेळानंतर या शाब्दिक चकमकीची चित्रफीत समाजमाध्यमांवर फिरू लागली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर आला. या वादावर उभयतांमध्ये समझोता झाल्याचे नंतर आमदार सुनील भुसारा यांनी  पत्रकारांना सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याने स्थानिक नेत्यांना राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मुंबई येथे बैठक घेऊन परस्परांतील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला. सद्य:स्थितीत जिल्हा परिषदेत असलेले राष्ट्रवादीचे आठ व काँग्रेसचा एक अशा नऊ सदस्यांनी शुक्रवारी दुपारी एकत्र नऊ सदस्यीय गट स्थापन करण्याचे नियोजित करण्यात आले व त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्याशी शुक्रवार दुपारची वेळ निश्चित करण्यात आली. तरीदेखील आपल्या पूर्वीच्या भूमिकेवर ठाम राहून राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा व काँग्रेस पक्षाचा एक असे सात सदस्य गुरुवारी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी यांच्या समक्ष हजर होऊन ज्ञानेश्वर सांबरे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र गट स्थापन केला. या कृतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला चपराक बसली असून अंतर्गत गटबाजीचे पुन्हा दर्शन घडले आहे.

शिवसेनेचा सावध पवित्रा

ल्ल  शिवसेनेने २० जुलै रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सावध पवित्रा घेतला आहे.त्यांनी १५ सदस्यांपैकी १४ जणांना  बुधवारी  अज्ञातस्थळी रवाना केले. सेनेचा उर्वरित एक सदस्य इतर सदस्यांसोबत असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.  सेनेचे सर्व  सदस्य अज्ञातस्थळी ‘संपर्क क्षेत्राच्या बाहेर’ आहेत.

ल्ल ४२ सदस्य संख्या असणाऱ्या जिल्हा परिषदेत शिवसेनेकडे १५, राष्ट्रवादी  व भाजपकडे प्रत्येकी आठ, कम्युनिस्ट  पाच, बहुजन विकास आघाडी  चार तर काँग्रेस व अपक्ष प्रत्येकी एक असे बलाबल आहे.   जिल्हा परिषदेत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, बविआ यांची एकत्रित सत्ता आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत वादामुळे  राजकीय हालचालींना वेग आला आहे.

जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आमदार सुनील भुसारा, माजी बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी व इतर लोक येऊन महिला सदस्य मंदा घरट यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला व इतर सदस्यांना दमदाटी व धक्काबुक्की केली. गुरुवारी नव्याने गट स्थापन करण्यात आले असून हा गट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षाच्या सदस्यांचा आहे.

ज्ञानेश्वर सांबरे, स्वतंत्र गटनेता राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस स्वतंत्र गट

ज्ञानेश्वर सांबरे, शीतल धोडी, संदेश ढोणे, गणेश कासट, मंदा घरट, देवानंद शिंगाडे, शैलेश करमोडा

Story img Loader