खते, बियाणे महाग दरात विकल्यास कारवाई

गेल्या दोन वर्षांत पालघर जिल्ह्यतील विविध भागात बियाणे, खते खरेदी केलेल्या शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले होते.

आर्थिक पिळवणुकीच्या पाश्र्वभूमीवर कृषी विभाग सतर्क

पालघर: गेल्या दोन वर्षांत पालघर जिल्ह्यतील विविध भागात बियाणे, खते खरेदी केलेल्या शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले होते. या पाश्र्वभूमीवर यंदा खरीप हंगामदरम्यान बियाणे, खते नियोजित किमतीपेक्षा अधिक किमतीत विकल्यास किंवा शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास अशा विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांचा परवाना रद्द केला जाईल असे कृषी विभागाने म्हटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

महिन्याभरात मान्सून सुरू होणार असल्याने शेतकरी वर्ग बियाणे, खते खरेदीसाठी लगबग करताना दिसत आहेत. काही विक्रेत्याकडून अजाण शेतकरी वर्गाची आर्थिक पिळवणूक होण्याची शक्यता लक्षात घेता कृषी विभाग सतर्क  झाला असून त्यांनी तसे फर्मानच असल्याचे सांगितले आहे.

करोनाच्या परिस्थितीत आधीच शेतकरी, बागायतदारवर्ग अडचणीत आहेत. त्यातच त्यांना खते, बियाणे खरेदीत अडचणी येऊ नये यासाठी पूर्व खबरदारी घेण्यात येत आहे. कोणत्याही कृषी सेवा केंद्रांमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दराने बियाणे विक्री करणे, खताची विक्री, खत उपलब्ध असूनही देण्यास नकार देणे, पक्के बिल न देणे, खरेदी पावती न देणे, मुदतबा बियाण्यांची विक्री करणे असे प्रकार नियमांना धरून नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत असे प्रकार घडल्यास त्यांनी तात्काळ नजीकच्या कृषी सहायक, अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देणे अपेक्षित आहे. तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

बियाणे, खते खरेदी करतानाची काळजी

खरेदी केलेल्या बियाण्याचे वेस्टन, पिशवी, लेबल, खरेदी पावती व त्यातील थोडे बियाणे पीक कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. खरेदी केलेले बियाणे त्याच हंगामासाठी शिफारस केल्याची खात्री करावी. तसेच बियाण्याची गुणवत्ता व दर्जा याची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करावी. बियाणे खरेदीची पक्की देयके, त्यावर बियाण्याचा संपूर्ण तपशील जसे पीक वाण, संपूर्ण लॉट नंबर, कंपनीचे नाव, खरेदीदाराचे नाव, पत्ता, सही, विक्रेत्याचे नाव व पत्ता, सही याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरची अंतिम मुदत पाहून घ्यावी.

मूळ दरापेक्षा अधिक दराने बियाणे तसेच खतांची विक्री केल्याच्या, फसवणूक केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास, आढळल्यास संबंधित विक्रेत्यांचा परवाना रद्द करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

काशीनाथ तरकसे, जिल्हा कृषी अधीक्षक, पालघर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पालघर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Action if fertilizers seeds sold high prices ssh

ताज्या बातम्या