scorecardresearch

आदिवासी विद्यार्थ्यांना बुद्धिबळाची गोडी लावण्यासाठी उपक्रम

बुद्धिबळ खेळल्यामुळे मुलांच्या बौद्धिक वाढीमध्ये होणारे सकारात्मक बदल लक्षात घेऊन आदिवासीबहुल तलासरी तालुक्यात जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना बुद्धिबळाची गोडी लावण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात आला. 

बुद्धिबळ स्पर्धेला उत्तम प्रतिसाद, जिल्हा परिषद शाळांतील २,५६० विद्यार्थ्यांचा सहभाग

पालघर: बुद्धिबळ खेळल्यामुळे मुलांच्या बौद्धिक वाढीमध्ये होणारे सकारात्मक बदल लक्षात घेऊन आदिवासीबहुल तलासरी तालुक्यात जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना बुद्धिबळाची गोडी लावण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात आला.  ७ मार्च २०२२ रोजी झालेल्या अंतिम सामन्यात जिल्हा परिषद शाळांतील तब्बल २५६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद पाहता पुढील वर्षी संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम राबवण्यात येईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जाहीर केले आहे.

बुद्धिबळ खेळताना वेळेचे नियोजन, त्वरित आणि अचूक निर्णय घेणे, आव्हानाला सक्षमपणे सामोरे जाणे, एकाग्रता, संयम, चिकाटी वाढणे आदी गुणधर्म विद्यार्थ्यांमध्ये विकसित होताना दिसतात. त्यामुळे हा खेळ विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासात भरच घालतो. हे लक्षात घेऊनच तलासरीचे गटविकास अधिकारी राहुल म्हात्रे आणि सहकाऱ्यांनी तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळ कौशल्य विकसित होण्यासाठी हा उपक्रम राबवला होता. जेणेकरून तालुक्यात उत्तम बुद्धिबळपटू तयार होण्यासही मदत होईल.

एल अँड टी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टमार्फत तलासरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १५४ शाळांमध्ये तेथील पटसंख्येच्या आधारे ३१८ बुद्धिबळ संचांचे वाटप करण्यात आले होते. राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धामध्ये सहभागी झालेले सुनील उरकुडे व इतर काही शिक्षकांच्या माध्यमातून बुद्धिबळ विशेष शिबिरांचे आयोजन केले गेले. त्यातून विद्यार्थ्यांची या खेळाविषयक गोडी वाढली. तसेच स्पर्धामधील नियम व कौशल्य शिकवण्यासाठीसुद्धा शालेय व केंद्र स्तरावर प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली.

करोना संक्रमणापूर्वी फेब्रुवारी २०२०मध्ये झालेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ५११ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. करोना काळानंतर या उपक्रमाला पुन्हा उभारी मिळाली. मार्च २०२० पासून  शालेय, केंद्रस्तरीय तसेच तालुकास्तरीय बुद्धिबळ  स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये  तब्बल २५६०विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या स्पर्धेची अंतिम फेरी आणि बक्षीस वितरण समारंभ ७ मार्च रोजी झाला. त्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ उपस्थित होते.  पुढील वर्षी संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम राबवण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Activities imparting chess tribal students participation ysh

ताज्या बातम्या