पालघर : महामार्गावरील खड्डे, त्यामुळे होणारे अपघात आणि नागरिकांची गैरसोय हा मुद्दा अगदी ऐरणीवर आल्यावर संघर्षांचे पडसाद उमटू लागले आणि महामार्ग प्राधिकरणासह देखभाल दुरुस्ती करणारी ठेकेदाराची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. ‘लोकसत्ता’ने हा मुद्दा वृत्तांमधून लावून धरला होता. त्यामुळे अखेर प्रशासनाने खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे. प्रसारमाध्यमांसाठी असलेल्या एका माहिती माध्यम समूहावर महामार्गावर विविध ठिकाणी खड्डे बुजवण्याचे काम सुरू असल्याची छायाचित्रे टाकत पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी खड्डे बुजवले जात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर घोडबंदरपासून ते गुजरात हद्दीपर्यंत पावसामुळे गेल्या महिन्याभरात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते.

त्याचा त्रास वाहनचालकांना, पादचाऱ्यांनाही होत होता. या खड्डय़ांमुळे अनेक अपघात झाले. शिवाय एकाचा बळीही गेला. त्यामुळेच महामार्गावर काम करणाऱ्या वाहन चालक मालक संघटना यांचे प्रतिनिधी, महामार्ग समाज माध्यम समूहाचे प्रतिनिधी, रुग्णमित्र, मृत्युंजय दूत, स्थानिक नागरिक यांनी खड्डे बुजवण्यासाठी संघर्ष सुरू केला. मात्र महामार्ग प्राधिकरण व महामार्ग देखभाल दुरुस्ती करणारी यंत्रणा याकडे लक्ष देत नव्हती. अखेर काही नागरिक आणि संघटनांनी स्वत:च श्रमदान करून हे खड्डे बुजवले होते. त्यानंतर वाढत असलेले अपघात लक्षात घेत आमदार राजेश पाटील, आमदार विनोद निकोले, आमदार श्रीनिवास वनगा, खासदार राजेंद्र गावित यांनी महामार्ग प्राधिकरणाला महामार्गावरील खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन करू, असे पत्र पाठवून आपला संताप व्यक्त केला होता. काँग्रेसनेदेखील खड्डय़ांचा विषय घेऊन टोलबंद आंदोलन केले होते. त्यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारी वर्गाशीही चर्चा केली होती. त्यानंतर या सर्व घटनांचे व संघर्षांचे पडसाद उमटू लागले.

लोकसत्तानेही याबाबत तपशिलात्मक वृत्तांकन करून हा प्रश्न चर्चेत ठेवला होता. अखेर महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महामार्ग देखभाल दुरुस्तीचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराला तातडीने महामार्गावरील खड्डय़ांची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. बुधवारपासून या खड्डेदुरुस्तीला सुरुवात झाली आहे. सध्या महामार्गावरील मोठे खड्डे शोधून त्यांची आधी दुरुस्ती केली जात आहे. येत्या दोन दिवसांत महामार्गावरील सर्व खड्डे बुजले जातील, असे आश्वासन दिले जात आहे. त्यासाठी विशेष प्रकारचे साहित्य ठेकेदाराने पुण्याहून मागवल्याचे सांगितले जात आहे. महामार्गावरील खड्डे बुजवल्यानंतर सेवा रस्ते व इतर ठिकाणच्या देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याचे महामार्ग प्राधिकरणामार्फत सांगण्यात आले आहे.