पालघर जिल्हा परिषदेच्या कमी पटसंख्येच्या शाळांवर गंडांतर
पालघर : राज्यातल्या १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या एकूण ३०३७ वसतिस्थानातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात १५ डिसेंबर रोजी मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय श्रमजीवी संघटनेने घेतला आहे.
जि. प. च्या पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळांमध्ये जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करण्यात येणार असली तरी सरकारच्या या निर्णयामुळे शिक्षण हक्क कायद्याचे (आरटीई) उल्लंघन होत असल्याचे आरोप होऊ लागले आहेत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना सात ते आठ किलोमीटरचा प्रवास करावा लागणार असून हे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर होतील अशी भीती व्यक्त करत श्रमजीवी संघटनेने शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात मंत्रालयासमोर आंदोलन करणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक २४ मार्च २०२१ रोजी विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा पुरविण्याकरिता वसतिस्थाने घोषित करणेबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला होता. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडून शाळा व वसतिस्थाने ( Habitations/ Settlements) यातील अंतराबाबतच्या प्राप्त झालेल्या माहितीच्या विश्लेषणाअंती वाहतूक सुविधेचा लाभ विद्यार्थ्यांना प्रदान करण्यासाठी ३०३७ वसतिस्थाने (Habitations) व एकूण १६ हजार ३३४ विद्यार्थी संख्या निश्चित केली आहे. या मध्ये ९ डिसेंबर २०२१ रोजी शुद्धीपत्रक काढण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयाचा पालघर, ठाणे, नाशिक आणि रायगड तसेच इतर आदिवासी व दुर्गम जिल्ह्यातील आदिवासी समाजाला मोठा फटका बसणार आहे. पालघर जिल्यातील एकूण १५८ शाळा बंद करण्यात येणार असून ठाणे जिल्ह्यातील ६२ शाळा, रायगड जिल्यातील १११ शाळा तर नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक ४०५ शाळा बंद होणार आहेत.
शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) तरतुदींनुसार चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांला वस्ती नजीकच्या एक किलोमीटरच्या परिसरात शाळा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. तर सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तीन किलोमीटर परिसरात शाळा उपलब्ध झाली पाहिजे. पटसंख्येचे कारण दाखवून शाळा बंद केल्याने शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन होणार असून, विद्यार्थ्यांना विहित अंतरापेक्षा अधिक प्रवास करून शाळेत जावे लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत श्रमजीवी संघटनेने आक्रमक पवित्र घेत बकऱ्या आणि दफ्तरे घेऊन १५ डिसेंबर रोजी धडक मोर्चाचे आयेजन केले आहे.