पालघर: पालघर तालुक्यात राज्य महामार्गावरील सफाळे कपासे रस्त्यावर नवीन उड्डाणपूल उभारण्याच्या कामासाठी हा मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा महत्वाचा मार्ग बंद होणार असल्यामुळे ग्रामस्थांसह लोकप्रतिनिधींनी संताप व्यक्त केला होता. त्याची दखल घेऊन हा मार्ग पर्यायी व्यवस्था होईपर्यंत सुरू ठेवण्याचे प्रशासनाने मान्य केले आहे.
पश्चिम रेल्वेलगत समर्पित मालवाहू प्रकल्पाचे (डीएफसी) काम सुरू आहे. त्यामार्फत कपासे उड्डाणपुलाजवळ नव्याने दुसरा उड्डाणपूल उभारणीसाठी वाहतुकीचा मुख्य रस्ता बंद केला जाणार होता. रस्ता बंद केल्यास पूर्व-पश्चिमेला जाण्यास सफाळे रेल्वे फाटकाशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध राहणार नव्हता. हा पर्यायी मार्ग अरुंद असल्याने मोठी वाहतूक कोंडीची मोठी समस्या असते. शिवाय या रस्त्याने गेल्यास मोठा फेरा पडणार होता. यामुळे इंधन आणि वेळही वाया जाणार होती. हा रस्ता बंद करू नये यासाठी आंदोलनाचा इशारादेखील दिला गेला. या प्रकरणात आमदार राजेश पाटील, आमदार श्रीनिवास वनगा यांनी विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच लोकप्रतिनिधी यांना सोबत घेऊन जिल्हा प्रशासनाशी सोमवारी तातडीने चर्चा केली. या चर्चेमध्ये मागणी लक्षात घेता पर्यायी व्यवस्था उपलब्धतेसाठी एक समिती स्थापन करण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी यावेळी दिली.
पर्यायी व्यवस्थेसाठी समिती
रस्ता बंद केल्यास त्यावर पर्यायी व्यवस्था काय? यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, प्रकल्पाचे अधिकारी आमदार व लोकप्रतिनिधी यांचा यात समावेश असणार आहे. या समितीने रस्त्याची व पर्यायी वाहतूक रस्त्याची संयुक्तरीत्या स्थळ पाहणी केल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल. जोवर पर्यायी व्यवस्था होत नाही तोवर हा रस्ता सुरू राहील, असे आश्वासन बैठकीत दिले गेले. त्याचबरोबरीने केळवे रेल्वेस्थानकापासून समांतर असलेला रस्ताही दुरुस्त करण्याची चर्चा झाली. समितीने स्थळ पाहणी केल्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्यामुळे सद्यस्थितीत सफाळेवासीयांना दिलासा मिळाला आहे.
शेतकरी, नोकरदार, विद्यार्थी, नागरिक, रुग्ण, बागायतदार व पर्यटक यांच्यासाठी तसेच पूर्व पश्चिमेला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. नागरिकांचा संताप लक्षात घेत सद्यस्थितीत हा रस्ता बंद केल्या जाणार नाही, पर्यायी व्यवस्था केल्यानंतरच तो बंद केला जाईल. यासाठी समिती स्थापन केली आहे.
-राजेश पाटील, आमदार