पालघर : शिक्षण, शेती व समाजसेवा या तीन गुणांचा संगम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी परिणामकारक ठरत असल्याचे डॉ. जयंतराव पाटील यांनी आपल्या जीवनात दाखवून दिले असून त्यांचा जीवनपट हाच समाजाला संदेश असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी बोर्डी येथे केले. त्यांचे कार्य पुढे नेण्यासोबत त्यांच्या कार्याचा प्रभाव सखोल व विस्तृत झाल्यास समाजाचा खऱ्या अर्थाने विकास होईल असेही त्यांनी सांगितले.
नियोजन समितीचे माजी सदस्य डॉ. जयंतराव पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ सोहळा २९ मार्च रोजी बोर्डी येथे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. काकोडकर उपस्थित होते. त्यांच्यासोबत आमदार विनोद निकोले, साहित्यिक मिलिंद बोकिळ, पत्रकार डॉ. आदिनाथ चव्हाण, वसई विरारचे महापौर अजीव पाटील, प्रथम महापौर राजीव पाटील, माजी आमदार मुस्ताक अंतुले, तसेच जन्मशताब्दी वर्ष समितीचे अध्यक्ष नरेश राऊत आदि मान्यवर उपस्थित होते.
बीएआरसी मध्ये सुरू असलेल्या कृषी क्षेत्रातील संशोधनाच्या निमित्ताने आपला डॉ. जयंतराव पाटील यांच्याशी संपर्क झाल्याचे सांगून डॉ. काकोडकर यांनी बीएआरसी मध्ये होणाऱ्या संशोधनाचा लाभ गरीब व आदिवासी शेतकऱ्यांना मिळावा यासाठी डॉ. जयंतराव यांच्या प्रयत्न बद्दल माहिती दिली. परदेशात संशोधन करण्याची संधी नाकारणे, त्यांनी बोर्डी व परिसरात आपले कार्यक्षेत्र निवडून समाजातील तळागाळातील नागरिकांचे जीवनमान उंचावणे, सुविधांमध्ये वाढ करणे, माणसं चांगले घडतील याकडे लक्ष देणे तसेच परिसरातील सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील तळागाळातील मंडळींना शेतीच्या माध्यमातून आयुष्यभर भूक भागवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची परतफेड हे त्यांचे कार्य सुरू ठेवून शक्य होऊ शकेल असा त्यांनी संदेश दिला.
समाजात व शासकीय सेवेत अनेक बडवे कार्यरत असून हे वातावरण सुधारण्यासाठी समाजात डॉ. जयंतराव पाटलांनी जोपासलेली समाजसेवेची भावना अधिक विस्तृत व कार्यरत करण्यासाठी आवश्यकता असल्याचे सांगत असे झाल्यास देशाची प्रगती झपाट्याने वाढेल असे मत व्यक्त केले. आगामी पिढीने डॉ. जयंतराव यांच्या जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
स्वातंत्र्य सोबत स्वराज्य महत्त्वाचे- मिलिंद बोकील
डॉ. जयंतराव पाटील यांच्यासारख्या कृषी शास्त्रज्ञ यांच्यासारख्या वटवृक्षा खालील सावलीत चिकू बागायतदार व पालघरच्या किनारपट्टीच्या भागातील नागरिक यांची भरभराट झाली असल्याचे प्रतिपादन साहित्यिक मिलिंद बोकील यांनी केले. शेतकरी, शेती (बळीराजा) यांच्यावर श्रद्धा असली पाहिजे, शेतीकरिता पाण्याचे समन्यायी पद्धती वाटप व्हायला पाहिजे, शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी मालाला किमान १०-१५ टक्के नफा मिळण्यासाठी किमान दर निश्चित करण्यात आले पाहिजे तसेच शेतीमध्ये काम नसताना रोजगार हमी योजना प्रभावी व व्यापक पद्धतीने राबवली पाहिजे असे त्यांनी सांगितले. शेतीमध्ये संशोधन करण्यासाठी मर्यादित संधी उपलब्ध असून शाश्वत व नैसर्गिक शेती यालाच आधुनिक शेती असल्याचे डॉ. जयंतराव पाटील यांचे विचाराचे समर्थन केले.
देशाला स्वातंत्र्य पुरेशान असून ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, कृषी क्षेत्रात असणारे परावलंबन संपवून स्वराज्य स्थापन करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. देशाला स्वयंपूर्ण करायचा असेल तर शेतीमध्ये प्रगती करणे गरजेचे असल्यावर त्यांनी भर देऊन डॉ. पाटील यांच्या समर्पित जीवन कार्याबद्दल गौरव उद्गार काढले.
पत्रकार डॉ. आदिनाथ चव्हाण यांनी डॉ. जयंतराव यांनी या भागात पेरलेल्या ज्ञानाचे पीक मोठ्या प्रमाणात आल्याचे सांगत समाजातील दरी मिटवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला. अध्यक्ष भाषणात माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी कोकणात चांगली माती असताना देखील अनेक कृषी उद्योग पश्चिम महाराष्ट्र व इतर भागात थांबले गेल्याबद्दल शासकीय धोरणावर टीका केली. शेतकरी कर्जमाफी व लाडक्या बहिण सारख्या योजना निवडणुकीच्या काळात सरकारला का आठवतात याबद्दल सवाल उपस्थित केला. बहिणीला अनुदान देण्याऐवजी त्याला सक्षम करणे आवश्यक असून जयंत रावांसारखे दीपस्तंभ सर्व विभागात उभे राहिल्यास समाजाचा विकास होऊ शकेल असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार विनोद निकोले, माजी आमदार मुस्ताक अंतुले, राजीव पाटील यांनी डॉ. जयंतराव यांच्या विषयी अनुभव व त्यांच्या कार्यपद्धतीबाबत प्रथम केले. कार्यक्रमाच्या आरंभी डॉ. जयंतराव पाटील यांच्या कार्याविषयी सादर करण्यात आलेला जीवनपट पाहून मोठ्या संख्येने उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवर, आप्तेष्ट व मित्रपरिवार भारावून गेला.
