निखिल मेस्त्री

महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षासह अनेक कारणांमुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महामार्गातील आखणीतील काही दोष अजूनही दुर्लक्षित राहिल्याने तसेच प्राधिकरण व महामार्ग दुरुस्ती-देखभाल पाहणाऱ्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अपघात वाढत असल्याचे अधोरेखित होत आहे. महामार्गावर अपघात रोखण्यासाठी व अपघात झाल्यानंतर मदतकार्य मिळण्यासाठी सोयीसुविधांचा अभाव असल्यामुळे महामार्गावरील वाढते अपघात ही चिंतेची बाब ठरू लागली आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा घोडबंदर ते गुजरात हद्दीपर्यंत अच्छाड नाका असा सुमारे ११० किलोमीटरचा आहे. गेल्या पाच वर्षांत झालेल्या गंभीर अपघातांमध्ये ४०० पेक्षा अधिक नागरिकांना प्राण गमवावा लागला असून अनेक जण जखमी झाल्याची नोंद आहे. यापलीकडे अप्रत्यक्ष अनेकांचा जीव गेल्याच्याही घटना आहेत. त्यामुळे महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा प्रकर्षांने पुढे येत आहे. 

महामार्गावर चिंचोटी, मनोर व चारोटी महामार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अनेक अपघातप्रवण क्षेत्र आहेत. या भागात किमान २४ अपघातप्रवण क्षेत्र  असल्याची माहिती पुढे येत आहे. महामार्ग प्राधिकरण व महामार्ग देखभाल दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदाराची यंत्रणा अशा अपघातप्रवण क्षेत्रांकडे दुर्लक्ष करत आहे. अपघातप्रवण क्षेत्र येण्याआधी लावले जाणारे सूचनाफलक, वेग नियंत्रण फलक, रम्बलर अशा अनेक बाबींचा अभाव दिसून येत आहे. अपघातप्रवण क्षेत्रातील भौगोलिक स्थिती, रस्त्याची रचना ही अपघातांना जबाबदार असली तरीही स्थानिक पोलीस वाहनचालकांना जबाबदार ठरवून तसा उल्लेख पोलीस दप्तरी करीत आहेत. महामार्ग प्राधिकरणाच्या बेजबाबदारपणाचा कुठेही या तक्रारींमध्ये उल्लेख आढळून येत नसल्याने अपघातप्रवण क्षेत्रात बदल वा दुरुस्ती होत नाही.

महामार्गावर तांत्रिक कारणांमुळे व इतर कारणांमुळे बंद पडणारी वाहने अपघातांना निमंत्रण देत असतात. नादुरुस्त झालेले वाहन अनेक तास तिथेच उभे राहते. महामार्ग पाहणारी यंत्रणा या वाहनांना बाजूला किंवा अन्य ठिकाणी हलवीत नसल्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात घडतात. करारानुसार महामार्ग देखभाल दुरुस्ती करणाऱ्या यंत्रणेमार्फत दर चार तासाला पेट्रोलिंग करणे अभिप्रेत आहे. सद्य:स्थितीत १०-१२ तासाने हे पेट्रोलिंग होत आहे. महामार्गावर काही ठिकाणी नेटवर्क उपलब्ध होत नाही. अपघात घडल्यानंतर तातडीने मदतकार्य मिळण्यासाठी महामार्गावर दर तीन किलोमीटर अंतरावर मदत संपर्क कक्ष (एसएसबॉक्स) बसवलेले आहेत. या कक्षाद्वारे यंत्रणांना संपर्क करून तातडीने मदतकार्य मिळवणे शक्य आहे. मात्र ही यंत्रणा नादुरुस्त अवस्थेत आहे. मदतकार्य पथक महामार्गावर चारोटी व खानिवडे टोल नाका येथे असल्यामुळे यादरम्यान कुठेही अपघात घडल्यास या पथकाला अपघातस्थळी पोहोचण्यास विलंब होतो.

महामार्गावर धाबे, हॉटेल्स, गेस्ट हाऊस यांची संख्या वाढली आहे. महामार्गाला जोडून असल्याने या ठिकाणी जाण्यासाठी अनधिकृत रस्ते तयार केले आहेत. या रस्त्यामधून वळण घेताना अनेक अपघात घडतात. महामार्गावरील सेवारस्तेही अपूर्ण असल्यामुळे अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. महामार्ग प्राधिकरण देखभाल करणारी यंत्रणा व धाबे, हॉटेल्स अशांचे आर्थिक हितसंबंध असल्यामुळे या अनधिकृत वळणांना अभय दिले जात आहे.

महामार्गाच्या परिघात तारापूर, आच्छड, वापी येथे औद्योगिक वसाहत असल्यामुळे या औद्योगिक वसाहतीतून घटक रसायन, ज्वलनशील पदार्थ तसेच घरगुती गॅस, औद्योगिक वापरासाठी लागणारा ज्वलनशील वायू, इंधन वाहणारे टँकर आदी वाहतूक मोठय़ा प्रमाणावर होत आहे. या पार्श्वभूमीवर महामार्गावर अग्निशमन बंब व त्याच्याशी निगडित यंत्रणा असणे आवश्यक असताना पालघर जिल्ह्याच्या महामार्ग हद्दीत अग्निशमन यंत्रणा अस्तित्वात नाही. गेल्या दोन वर्षांत महामार्गावर अपघातानंतर आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या असून काही चालकांचा मृत्यूही झाला आहे. आगीच्या घटना घडल्यानंतर बोईसर, डहाणू, वसई-विरार किंवा पालघर येथून अग्निशमन बंब पाचारण करावा लागतो. अग्निशमन यंत्रणा महामार्गावर उपलब्ध नसल्याने अनेकदा वाहतूक विस्कळीत होते.

अपघात घडल्यानंतर जखमींना तात्काळ मदत मिळण्यासाठी प्रथमोपचार व्यवस्था व रुग्णवाहिका यंत्रणा उपलब्ध नाही. महामार्गावरील स्थानिक नागरिक, महामार्ग पोलीस मृत्युंजय ग्रुप अशा संस्थांमार्फत तातडीची मदत प्राप्त होते. भरघोस प्रमाणात टोल वसूल करणारी महामार्ग प्राधिकरण किंवा त्यांची तत्सम यंत्रणा काय करते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महामार्ग पोलीस तत्परतेने कार्यरत असले तरी त्यांना महामार्ग यंत्रणेची साथ नसल्याने त्यांना अनेक वेळा अडचणींचा सामना करावा लागत आहे.

महामार्ग प्राधिकरणाने महामार्ग देखभाल दुरुस्तीसाठी ठेवलेल्या यंत्रणेने केलेले काम याचे मोजमाप करण्यासाठी कन्सल्टिंग इंजिनीअर ग्रुप ही संस्था नेमलेली आहे. महामार्ग ठेकेदार यंत्रणा काम करते की नाही याचे मोजमाप व त्यांनी केलेले काम याच्या नोंदी या संस्थेने ठेवायच्या आहेत. मात्र अपघातांची शृंखला सुरू असताना यंत्रणा व संस्था व्यवस्थित काम केल्याचे दाखवले जात आहे. यात उभयत्यांमध्ये हितसंबंध असल्याची शंका व्यक्त केली जाते. महामार्गावर देखभाल-दुरुस्तीच्या नावाने वाहनांकडून कोटय़वधीचा टोल वसूल केला जात असताना सुविधांचा स्तर असमाधानकारक आहे.

शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींचे महामार्गाच्या विविध प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. दररोज वाढत जाणाऱ्या अपघातांमुळे हा महामार्ग व महामार्गावरून धावणारी वाहने मृत्यूच्या खाईत लोटली जात आहेत. या पार्श्वभूमीवर या सर्व शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करून महामार्ग प्राधिकरणाला अपघात व अपघातात मृत्युमुखी पडणारे जीव वाचविण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यासाठी तगादा लावायला हवा. तसेच महामार्गावर सोयी-सुविधांचा स्तर उंचावून महामार्ग अधिक सुरक्षित बनविण्यासाठी  प्रयत्न करायला हवेत.