निष्काळजीपणा भोवला, पालघर जिल्हा पुन्हा श्रेणी तीनमध्ये

पालघर :  नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे जिल्ह्यतील रुग्णवाढीचा आलेख वाढल्याने जिल्हा अवघ्या एक आठवडय़ातच श्रेणी दोनमधून तीनमध्ये वर्ग झाला आहे. शासनाच्या रुग्णवाढीच्या निकषानुसार पालघर जिल्ह्यत पाच टक्केहून अधिक रुग्णसंख्या आढळल्याने जिल्ह्यची श्रेणी घसरली आहे.

शासनाच्या रुग्ण संख्येच्या निकषानुसार आठवडाभरापूर्वी पालघर जिल्हा श्रेणी दोनमध्ये आला होता. त्यामुळे  जनजीवन पूर्वपदावर आले होते. नागरिकांचा निष्काळजीपणा तसेच प्रशासनाने करोना उपाययोजनांवर लक्ष न दिल्यामुळे रुग्ण वाढीचा आलेख अवघ्या आठवडय़ाभरातच वाढू लागला. सद्यस्थितीत जिल्ह्यत एक हजार ३०० पेक्षा जास्त रुग्ण उपचाराधीन आहेत. जिल्ह्यत शासकीय व खासगी उपचार केंद्रांमध्ये पुरेशा खाटा व प्राणवायू खाटा उपलब्ध आहेत. मात्र रुग्णवाढ कायम असल्याने श्रेणीत घट झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

जिल्हा श्रेणी तीनमध्ये आल्याने  अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना व दुकाने शनिवार व रविवारी बंद राहतील. किराणा, भाजीपाला, डेअरी ही दुकाने सोमवार ते रविवारी तर कपडय़ाची दुकाने, कटलरी, ज्वेलर्स, स्टेशनरी, कपडे धुऊन मिळण्याचे ठिकाण, इलेक्ट्रॉनिक, हार्डवेअरसह इतर आवश्यक दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते सायंकाळी चार या वेळेत खुले असतील. चित्रपटगृहे, मॉल्स, नाटय़गृहे पूर्णपणे बंद ठेवली जातील. उपाहरगृहे सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते सायंकाळी चार या वेळेत ५० टक्के ग्राहक क्षमतेने खुले असतील, तर चारनंतर पार्सल सुविधा सुरू असेल आणि शनिवार, रविवारी रेस्टॉरंट ग्राहकांसाठी बंद असतील. मात्र पार्सल सुविधा सुरू राहील. जिम, सलून आणि पार्लरलाही यामध्ये सूट देण्यात आली आहे, सायंकाळी सातवाजेपर्यंत ५० टक्के ग्राहक क्षमतेने ती सुरू ठेवता येणार असली तरी ग्राहकांना पूर्वनियोजित वेळ ठरवूनच प्रवेश देता येईल. ५० टक्के कर्मचारी कार्यरत असलेली कार्यालये उघडण्याची परवानगी  आहे. शासकीय कार्यालयात ५० टक्के उपस्थितीसाठी परवानगी आहे.  सार्वजनिक वाहनांना पूर्णपणे सवलत आहे.   लग्नात ५० जणांना तर अंत्यविधीसाठी २० जणांच्या उपस्थितीस परवानगी असेल.  सार्वजनिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम हे ५० टक्के प्रेक्षक उपस्थितीसह सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चापर्यंत सुरू राहतील.  सर्व कारखाने, उत्पादन व निरंतर प्रक्रिया उद्योग, निर्यातदार यांना कर्मचारी ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. मात्र कामगारांची वाहतूक व्यवस्था संबंधितांनी करायची आहे.  सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी लागू राहणार आहे. तर संध्याकाळी पाच नंतर जिल्ह्यत संचारबंदी लागू असणार आहे. सोमवार सात जून रोजी सकाळी सात वाजेपासून हा आदेश संपूर्ण पालघर जिल्ह्यत लागू होईल.

खाटा उपलब्ध

पालघर जिल्ह्यत ३१७  प्राणवायू खाटांवर रुग्ण उपचाराधीन आहेत. तर १३१२ खाटा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत, तर कृत्रिम श्वसन प्रणालीच्या १० खाटांवर रुग्ण उपचाराधीन असून १५४ खाटा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. जिल्ह्यत आतापर्यंत आठवडानिहाय २५ हजार ४०५ जणांचे नमुने घेतले आहेत.  १३१५ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यतील रुग्णदर ५.१८ टक्के  इतका आहे.