पालघर : जिल्ह्यातील वृद्ध साहित्यिक व कलाकारांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देताना पूर्णतः पारदर्शकता पाळली जावी, या उद्देशाने पालघर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. ‘राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजना’ समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील कलाकारांच्या दस्तऐवजांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. यावेळी पद्मश्री भिकल्या धिंडा यांचा गौरव करण्यात आला.
पालघर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागांतर्गत राबविल्या जाणाऱ्या राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेचा लाभ खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. 3 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या समिती बैठकीत जिल्ह्यातील ६५ कलाकारांच्या मूळ दस्तऐवजांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली.
शासकीय योजनांचा लाभ मिळवताना अनेकदा कागदोपत्री त्रुटींमुळे पात्र कलाकार वंचित राहतात किंवा अपात्र व्यक्ती लाभ घेण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शकतेची प्रक्रिया राबवली जात आहे. केवळ निकषांची पूर्तता करणाऱ्या आणि कलेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या वृद्ध कलाकारांनाच या ५,००० रुपये प्रतिमहा मानधनाचा लाभ दिला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरवर्षी जिल्ह्यासाठी १०० कलाकारांचा इष्टांक निश्चित असतो. यांची निवड शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसारच केली जाते. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची सत्यता तपासण्यासाठी या बैठकीत पालघर जिल्ह्यातील कलाकारांना प्रत्यक्ष बोलावून संवाद साधण्यात आला. पात्र कलाकारांची माहिती डिजिटल स्वरूपात अद्ययावत केली जात आहे जेणेकरून मानधन वितरण प्रक्रियेत विलंब होणार नाही.
या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) डॉ. रुपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा सदस्य सचिव अशोक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद शरीफ मसलत, जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर आणि जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. यावेळी पद्मश्री पुरस्कार प्राप्त तारपा वादक भिकल्या धिंडा यांना उपस्थित मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
… या समितीतीलच एक कलाकार पद्मश्री पुरस्कार प्राप्त करतो, ही सर्व कलाकारांसाठी प्रेरणादायी बाब आहे. आपल्यातूनही कोणीही अशा सर्वोच्च सन्मानापर्यंत पोहोचू शकतो. – मनोज रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी

