बोईसर :पावसाळा सुरू होताच पालघर जिल्ह्यातील गडकिल्ले आणि पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पर्यटन स्थळी पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असताना आवश्यक सुरक्षा उपाययोजनांची कमतरता असल्याने अपघाताची भीती व्यक्त होत आहे.पावसाळा सुरू होताच पालघर जिल्ह्यातील गडकिल्ले,धबधबे आणि इतर पर्यटन स्थळांवर पर्यटकांचा ओघ सुरू झाला आहे. आशेरी, असावा, गंभीरगड, काळदुर्ग, तांदूळवाडी, कोहोज, टकमक हे प्रसिद्ध गडकिल्ले जव्हार मधील दाभोसा, हिरडपाडा, खडखड सारखे धबधबे, वांद्री धरण या ठिकाणी शनिवार रविवार आणि सुट्टीच्या दिवशी स्थानिक नागरिक आणि मुंबई,ठाणे नाशिक परिसरातील पर्यटकांची प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. जिल्हा प्रशासनाने पावसाळ्यात धोकादायक ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी लागू केलेले मनाई आदेश धुडकावून लावत पर्यटक या ठिकाणी गर्दी करीत आहेत.

मनोर जवळील आशेरी गडावर रविवारी दिवसभरात जवळपास पाच हजार पर्यटकांनी हजेरी लावली. प्रचंड गर्दीमुळे गडावरील लोखंडी शिडीच्या अवघड जागी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती. लोखंडी शिडीवरून एका वेळी फक्त एकच माणूस चढ उतार करू शकेल इतकीच जागा उपलब्ध असल्याने या ठिकाणी पर्यटकांची लांबलचक रांग लागली होती. गडकिल्ल्यांवरील उंच भाग, दरया, बुरुज त्याचप्रमाणे वांद्री धरणाचा सांडवा, पावसाने तुडुंब भरलेला तलावांच्या ठिकाणी फोटो आणि रील काढण्यासाठी पर्यटकांकडून धोकादायक साहस केले जात आहे. या सर्व गैर प्रकारांवर तातडीने नियंत्रण आणल्यास भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पर्यटन स्थळी स्थानिक ग्रामपंचायत, पोलिस किंवा वनविभाग यांचे कोणताही प्रकारे नियंत्रण नसल्यामुळे बेशिस्त पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा, ऐतिहासिक वास्तूंची मोडतोड आणि नुकसान करण्याचे प्रकार घडत आहेत. मोठ्या आवाजात गाणी आणि संगीत वाजवण्याच्या प्रकारामुळे शांतता भंग होऊन वन्य प्राण्यांना त्रास होत असतो. त्याचप्रमाणे गडांवर शौचालय आणि स्वच्छतागृहांअभावी मानवी मल मुत्राची दुर्गंधी आणि त्रास सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे अनेक बेशिस्त पर्यटकांकडून गडकिल्ल्यांवर मद्यपान आणि जेवणावळी करून गडाचे पावित्र्य धोक्यात आणले जाते. पावसाळी पर्यटनासाठी नियम आणि सुरक्षाविषयक उपाय योजना तयार करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

तांदळवाडी किल्ल्यावर भूस्खलन :

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सफाळे जवळील तांदुळवाडी गडावर मोठे भूस्खलन झाले. भूस्खलन झाले त्यावेळी गडावर कोणी पर्यटक नसल्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. भूस्खलनामुळे गडावर जाणारी मुख्य पायवाट नष्ट झाली असून ५० ते ६० झाडे मातीच्या ढिगार्‍याखाली गाडली गेली आहेत. पर्यटकांनी तांदुळवाडी गडावर जाताना दुसऱ्या वाटेचा वापर करावा तसेच सावधगिरी बाळगण्याचे आवाहन दुर्ग संवर्धनाचे काम करणाऱ्या संस्थानी केले आहे.

शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठान यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून अशेरी गडावर श्रमदान व स्वच्छता मोहिमा राबविल्या जात आहेत. मात्र, पावसाळा सुरू झाला की गडावर हजारो पर्यटकांची गर्दी होते. अनेक जण प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे वेष्टन तसेच इतर कचरा गडावरच टाकून निघून जातात याची खंत वाटते.-अनिकेत कुडतरकर,शिवशंभु प्रतिष्ठान