डहाणू: आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला भेट देऊन एक अविस्मरणीय अनुभव घेतला. डहाणूचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी विशाल खत्री आणि एल अँड टी कंपनी यांच्या संकल्पनेतून या विशेष अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष प्रचिती विद्यार्थ्यांना मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
सध्या डहाणू प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सवने, झरी, तलासरी, तवा, साखरे, रणकोळ, अस्वाली, वरवाडा, डोंगरी आणि उधवा अशा एकूण १० आश्रमशाळांमधील ३५० विद्यार्थी बारावीच्या पूर्वतयारीसाठी ‘क्रॅश कोर्स’ अंतर्गत जादा तास करत आहेत. या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच विरंगुळा मिळावा या दृष्टीने ४५ विद्यार्थ्यांची त्यांच्या इच्छेनुसार निवड करण्यात आली होती. या निवडक विद्यार्थ्यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कार्यस्थळाला भेट देऊन तेथील तांत्रिक बाबी समजून घेतल्या.
या अभ्यास दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांनी आशागड आणि आंबेसरी येथील बुलेट ट्रेनच्या बोगद्यांच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. डोंगराच्या पोटातील हे अजस्त्र बोगदे, त्यांचे खोदकाम आणि त्यासाठी वापरण्यात आलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान पाहून विद्यार्थी थक्क झाले. एल अँड टी कंपनीकडून प्रकल्पातील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना बोगद्यांची लांबी, त्यांचे महत्त्व आणि बुलेट ट्रेनच्या मार्गाची तांत्रिक वैशिष्ट्ये सोप्या भाषेत समजावून सांगितली. देशातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती घेताना विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता दिसून आली.
केवळ वर्गात बसून शिक्षण घेण्याऐवजी प्रत्यक्षात सुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पाचा अनुभव घेतल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली आहे. देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे काम जवळून पाहण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. हा प्रकल्प भविष्यात प्रवासाची गती कशी बदलणार आहे आणि यामध्ये इंजिनिअरिंगचे कोणते बारकावे आहेत हे पाहून अनेकांना प्रेरणा मिळाली.
प्रकल्प अधिकारी विशाल खत्री यांच्या या पुढाकारामुळे आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली आहे. अशा प्रकारच्या अभ्यास दौऱ्यांमुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल घडत असून, त्यांच्या करिअरच्या कक्षा रुंदावण्यास मदत होईल, अशी भावना शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. “आम्ही आजपर्यंत केवळ बातम्यांमध्ये ऐकलेला बुलेट ट्रेनचा प्रकल्प प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे,” अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. या दौऱ्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील रस तर वाढवलाच, पण त्यांना नव्या आधुनिक भारताचे दर्शनही घडवले.
