वाडा : गेल्या आठवडय़ात वाडा तालुक्यातील बिलोशी या गावी रात्री दोनच्या सुमारास येथील शेतकरी सुरेश भोईर यांच्यावर अचानक प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेचा छडा बोईसर गुन्हे शाखेने लावला असून घरगडय़ानेच हा हल्ला केल्याचे उघड झाले आहे. हल्लेखोरास पोलिसांनी अटक केली आहे.
बिलोशी येथील शेतकरी सुरेश भोईर हे रात्रीच्या वेळी शेतावर पिकाची राखण करण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचा घरगडी राजेश वाजे हासुद्धा होता. मध्यरात्री मालक झोपी गेले असता वाजे यांनी मालकावर असलेल्या रागापोटी हातात लोखंडी रॉड घेऊन झोपलेले सुरेश भोईर यांच्या डोक्यावरती तीन ते चार वेळा ताकदीने मारून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. मालक बेशुद्ध अवस्थेत गेल्यानंतर वाजे याने स्वत: धावत जाऊन मालकाच्या घरी माहिती दिली की कुणीतरी दोघा माणसांनी येऊन मालकाला खूप मारले आहे. मी आरडाओरडा केला असता ते घाबरून पळून गेले असे सांगितले.
घरची मंडळी पाहण्याकरिता त्या ठिकाणी गेले असता सुरेश भोईर बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना तात्काळ सरकारी रुग्णालयात हलवण्या त आले. त्यानंतर या घटनेची माहिती वाडा पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी येऊन त्यांनी तपास सुरू केला.
तपासाच्या वेळेस घरगडी राजेश वाजे यांनी स्वत: पोलिसांना माहिती दिली की, कोणीतरी दोन अज्ञात माणसांनी मालकाला लोखंडी रॉडने मारल्याचे मी बघितले. आरडाओरड करताच पळून गेल्याचे सांगितले.
या प्रकरणी बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनेची माहिती घेऊन घरगडी राजेश वाजे याचीही चौकशी सुरू केली. या चौकशीत वाजे यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी राजेश वाजे यास बेडय़ा ठोकल्या.
