आदिवासी भागात लसीकरणासाठी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचे भेटकार्डाद्वारे भावनिक आवाहन

नितीन बोंबाडे

डहाणू : तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. त्यादृष्टीने आदिवासी भागांतील लसीकरणासाठी प्रशासनाकडून पालघर जिल्ह्यात भेटकार्डाद्वारे लसीकरणाची जनजागृती करण्याचा  अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आदिवासी भागांत लसीकरणाविषयी अनेक गैरसमज असल्याने त्याची टक्केवारी कमी दिसून येते. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी लसीकरण करण्याची गरज आहे. वेगवेगळय़ा माध्यमातून जनजागृती करूनही नागरिक लसीकरणाला तयार होत नसल्याने प्रांत अधिकारी अशिमा मित्तल यांनी भेटकार्डमार्फत प्रबोधन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

भेटकार्ड तयार करून त्यावर  कृपया या साथीच्या आजारात कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी लसीकरण करा. आश्रमशाळेतील आमच्या शिक्षकांनीही लसीकरण केले आहे आणि ते सुरक्षित आहेत. त्यामुळे तुम्हीही लसीकरण करा असे  भावनिक आवाहन विद्यार्थ्यांनी पालकांना केले आहे. या उपक्रमामुळे आदिवासी भागातील नागरिकांत लसीकरणाची जनजागृती होऊन नागरिकांत लसीकरणाला प्रतिसाद वाढेल असा विश्वास  अशिमा मित्तल यांनी व्यक्त केला.

आदिवासी समाजातील नागरिकामध्ये करोना लशीविषयीचे असलेले गैरसमज दूर करून करोना प्रतिबंधक लसीकरणात सहभाग वाढवण्यासाठी पालघर जिल्ह्यातील  आदिवासी प्रकल्प संचालित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांकडून गावोगावी त्यांच्या पालकांना पोस्टकार्ड  पाठवून पाल्यांनी आपल्या पालकांमध्ये जनजागृती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आदिवासी विकास विभाग संचालित डहाणू आणि पालघर तालुक्यतील तब्बल १२ आश्रम शाळांतून तीन हजार विद्यार्थ्यांनी ही पोस्ट कार्ड आपल्या राहत्या घरी टपाल केल्याचे अशिमा मित्तल यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

लसीकरणाविषयी आदिवासी भागात अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून भेटकार्ड पाठवून त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचा व त्यांना प्रवाहात आणण्याचा हेतू साध्य होण्यास मदत होऊ शकेल.

– अशिमा मित्तल, प्रांत अधिकारी डहाणू तथा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी