पालघर: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचा (महापारेषण) महत्त्वाकांक्षी बाभळेश्वर – कुडूस ४०० के.व्ही. हा वीजवाहिनी प्रकल्प गुरूवारी सायंकाळी (दि.९) पूर्ण होऊन वीजवाहिनी कार्यान्वित करण्यात आली. या प्रकल्पामुळे वीजपुरवठा अधिक सक्षम, स्थिर आणि विश्वासार्ह होणार आहे. यामुळे सुमारे पाच मेगावॅट वीज नुकसान कमी होणार असून मुंबई महानगर प्रदेशातील विद्युत दाबामध्ये योग्य ती सुधारणा होणार आहे. तसेच या व्दिपथ वाहिनीवरून सुमारे ३००० मेगावॅटपर्यंत अतिरिक्त वीज वहन क्षमता उपलब्ध होणार असून मुंबई, ठाणे, पालघर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे.
२०१० मध्ये मंजूर झालेल्या या प्रकल्पाची अंमलबजावणी मेसर्स कल्पतरू प्रोजेक्टस इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीमार्फत करण्यात आली. सुरुवातीला २०१३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असलेला हा प्रकल्प विविध अडचणींमुळे लांबला होता. मात्र, गतिमान शासनामुळे आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयामुळे अखेर मार्च २०२६ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात आले.
या प्रकल्पांतर्गत एकूण ७१५ मनोरे उभारण्यात आले असून सदर व्दिपथ वाहिनीची लांबी सुमारे २२८ कि.मी. आहे. यापैकी नाशिक विभागात ४८५ मनोरे उभारणी आणि ३०४ सर्किट कि.मी. तारा ओढण्याचे काम, तर वाशी विभागात २३० मनोरे उभारणी आणि १५२ सर्किट कि.मी. तारा ओढण्याचे काम पूर्ण झाले आहे.
प्रकल्प राबविताना अनेक तांत्रिक व प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागला. पुणे जिल्ह्यातील जागतिक दर्जाच्या रेडिओ दुर्बिणीच्या (GMRT) परिसरातून मार्ग जात असल्याने विशेष परवानग्या घ्याव्या लागल्या. तसेच जमिनीचे मोबदले, वनविभाग परवानग्या, राईट ऑफ वे (मार्गाधिकार) (RoW) समस्या, साहित्य वाहतूक यांसारख्या अनेक आव्हानांवर मात करण्यात आली. काही भागात जंगलातून साहित्य वाहून नेण्यासाठी मानवी श्रमांचा वापर करावा लागला, तर काही ठिकाणी वीजवाहिन्यांवर हॉटलाइन स्ट्रिंगिंग करून काम पूर्ण करण्यात आले.
सांघिक कामाचे यश
मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर, अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली महापारेषणचे संचालक ( प्रकल्प/संचलन) सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता महेंद्र वाळके, वाशी परिमंडळाचे मुख्य अभियंता महेश भागवत यांनी व त्यांच्या चमूने ही यशस्वी कामगिरी केली आहे.
बुलेट पॉईंट्स :
• मुंबई, ठाणे परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम व स्थिर
• प्रकल्पामुळे सुमारे पाच मेगावॅट वीज नुकसान कमी होणार
• व्दिपथ वाहिनीव्दारे ३००० मेगावॅटपर्यंत अतिरिक्त वीज वहन क्षमता
• मुंबई, ठाणे, पालघर व अहिल्यानगर जिल्ह्यांना मोठा फायदा
• एकूण ७१५ मनोरे उभारणी; सुमारे २२८ कि.मी. लांबीची वीजवाहिनी
• नाशिक विभागात ४८५ मनोरे, वाशी विभागात २३० मनोरे उभारणी
• GMRT परिसरातून मार्गामुळे विशेष परवानग्यांची गरज
• RoW, वनपरवानग्या, मोबदले यांसारख्या अडचणींवर मात
• जंगल भागात मानवी श्रम व हॉटलाइन स्ट्रिंगिंगचा वापर
• पडघे–बाभळेश्वर वीजवाहिनीवरील ताण कमी होणार
• कुडूस उपकेंद्राला अतिरिक्त वीज स्रोत उपलब्ध
• स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी व विविध विभागांचे सहकार्य
• मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्प पूर्ण
• महापारेषणच्या अधिकाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांचे यश
