बाळासाहेबांची शिवसेनाची बिनविरोध सत्ता; अध्यक्षपदी प्रकाश निकम तर उपाध्यक्षपदी भाजपचे पंकज कोरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर: पालघर जिल्हा परिषदेत सत्तांतर झाले असून बाळासाहेबांची शिवसेनाने भाजपच्या साथीने बिनविरोध सत्ता स्थापन केली आहे. बुधवारी झालेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिंदे गटाचे प्रकाश निकम, तर भाजपचे पंकज कोरे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. दोन्ही पदांसाठी विरोधात एकही अर्ज न आल्याने निवड बिनविरोध घोषित करण्यात आले.

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी गेल्या काही दिवसांपासून राजकीय खलबते सुरू होती. सत्ता प्रस्थापित करण्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. त्यातच ठाकरे गटाचे वीस सदस्य आपल्याकडे आणण्याचे प्रयत्न यशस्वी झाल्याने शिंदे-भाजप गटाने जिल्हा परिषदेची सत्ता काबीज केली आहे. एक विषय सभापतीपद मिळेल यासाठी बहुजन विकास आघाडीने शिंदे-भाजप गटाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. 

अध्यक्ष-उपाध्यक्षसाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे मतदान प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे   पीठासीन अधिकारी धनाजी तोरस्कर यांनी उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवडणुकीच्या दरम्यान पालघर जिल्हा परिषदेच्या इमारतीला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. स्वत: पालकमंत्री रवींद्र चव्हाण यावेळी हजर राहणार असल्यामुळे पोलिसांचा प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हा परिषदेचे दोन्ही रस्ते अडवण्यात आले होते. प्रत्येकाला विचारपूस केल्यानंतरच जिल्हा परिषदेच्या इमारतीत सोडण्यात येत होते. जिल्हा परिषद सदस्यांना प्रचंड पोलीस बंदोबस्तात कार्यालयात आणण्यात आले.

 रवींद्र चव्हाण यांच्यासह शिंदे गटाचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक, आमदार श्रीनिवास वनगा, राजेश पाटील तसेच अनेक जिल्हा परिषद सदस्य व राजकीय पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्हा परिषदेवर सन २०१४ व २०१९ मध्ये सदस्य असलेले प्रकाश निकम यांना अध्यक्ष वा उपाध्यक्षपद देण्याचे आश्वासन दिल्यानंतरही ते हुकले होते. मात्र आता शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांची अध्यक्षपदावर निवड झाली आहे. तर भाजपचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले पंकज कोरे यांची वर्षभरापूर्वीच वनई गटातून सदस्यपदी निवड झाली होती. या निवडणुकीत त्यांनी खासदार राजेंद्र गावित यांच्या मुलाचा पराभव केला होता.  दरम्यान, पालघर तालुक्याला दोन वेळा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष वैदही वाढाण या दांडी गटातील जिल्हा परिषद सदस्य असून नवनियुक्त अध्यक्ष प्रकाश निकम हे तारापूर गटातून सदस्य म्हणून निवडून आले आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव निष्फळ

राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत महाविकास आघाडीची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. शिवसेनेचे काही सदस्य आपल्याकडे करून इतर पक्षाच्या साहाय्याने सत्ता स्थापनेची समीकरणे राष्ट्रवादी काँग्रेसने जुळवली होती, परंतु ठाकरे गटाचे सदस्य शिंदे गटात गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा डाव फसला. मात्र होणाऱ्या विषय समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे काही सदस्य शिंदे गटासोबत आहेत अशी चर्चा आहे.

 ठाकरे गटातील सदस्यांच्या गटबदलामुळे सत्ता

जिल्हा परिषद स्थापनेनंतर शिवसेना-भाजप युतीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सभापती सत्तेत होते, त्यानंतर ठाकरे गटाच्या दोन महिला सदस्य अध्यक्षपदावर विराजमान झाल्या, तर दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचा उपाध्यक्ष होता. मात्र यावेळी शिंदे व ठाकरे गट निर्माण झाल्याने शिंदे गटाने ठाकरे गटातील सदस्य सोबत घेऊन भाजपच्या सदस्य संख्येच्या बळावर आपली सत्ता प्रस्थापित केली. ्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या सदस्यांमुळे शिंदे- भाजप गटाला सत्ता मिळवता आली, असे म्हटले जात आहे. 

‘मी शिंदे गटात प्रवेश केलेला नाही’

बुधवारी पालघर जिल्हा परिषदेची अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक झाली. उद्धव ठाकरे गटाचे १९ सदस्य शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेनामध्ये गेलेले आहेत. ठाकरे गटातील गटनेता जयेंद्र दुबळा यांनाही नेण्यात आले होते. मात्र हातावर तुरी देऊन ते पालघरला पळून आले. त्यानंतर दबावतंत्र म्हणून शिंदे गटाच्या सदस्याला पळवल्याची तक्रार दुबळा व इतर ११ सदस्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांना शिंदे गटाकडे ठेवण्यात आले होते. बुधवारी माजी आमदार व शिंदे गटाचे पालघर संपर्कप्रमुख रवींद्र फाटक हे दुबळा यांना पोलीस बंदोबस्तात आणत असताना आपण शिंदे गटामध्ये प्रवेश केला नाही, असे विधान दुबळा यांनी उपस्थित पत्रकार यांच्या समोर केले. तसेच मी आता एकटा आहे. माझ्यासोबत पक्षाचे कोणीच सदस्य नाही. म्हणून मी या प्रक्रियेत तटस्थ राहणार, असे त्यांनी माध्यमाला सांगितले. त्यामुळे जयेंद्र दुबळा यांच्यावर शिंदे गटाचा पूर्ण दबाव असल्याचे त्यांच्या विधानावरून दिसून येते, अशी चर्चा येथे रंगत असल्याचे पाहायला मिळाले.

आता विषय समित्यांसाठी चुरस

पालघर जिल्हा परिषदेच्या विविध विषय समिती सभापती पदासाठी ठाकरे गटातून शिंदे गटाकडे आलेल्या सदस्य वर्ग सभापतीपदासाठी इच्छुक असल्याचे समजते तसेच नव्याने स्थापन होणाऱ्या गटाच्या गटनेत्यासाठीही विविध सदस्य वर्गामध्ये चुरस लागली आहे. त्यामुळे सभापती व गटनेता पदासाठी जिल्हा परिषदेमध्ये इच्छुकांची मांदियाळी दिसून येत आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb shivsena win prakash nikam as president and pankaj kore of bjp as vice president ysh
First published on: 17-11-2022 at 00:58 IST