नीरज राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या तीन वर्षांपूर्वी उत्तर भारतात सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेस या गाडीची चाचणी अहमदाबाद – मुंबई दरम्यान ९ सप्टेंबर रोजी संपन्न झाली. ४९१ किलोमीटरचे अंतर सव्वा पाच तासांत या गाडीने पार केले. स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ही गाडी लवकरच कार्यरत होणार असली तरी या व अशा गाडय़ांचा मुंबई लगतच्या महाराष्ट्रातील भागाला कितपत फायदा होणार हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

मुंबईला पाणीपुरवठा, फळभाज्या-दूध व मनुष्यबळ पुरवणाऱ्या पालघर जिल्ह्यातील दळणवळणाची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून कायम असून नवीन जलद गाडय़ा सुरू करत असताना राज्यातील प्रवाशांसाठी मात्र वेगवेगळी कारणे पुढे करून नव्या सेवांपासून वंचित ठेवले जात आहे. त्यांना हलाखीतीच्या परिस्थितीत प्रवास करावा लागत आहे.

मुंबई लगत वसलेल्या पालघर जिल्ह्यातील अनेक नैसर्गिक स्त्रोतांचा देशाच्या आर्थिक राजधानीला लाभ झाला आहे. शिवाय मुंबईमध्ये निवाऱ्याची समस्या निर्माण झाल्याने लो कॉस्ट हाऊसिंग अर्थात माफक दरात निवासाची सुविधा म्हणून पालघर जिल्ह्याकडे पाहिले जात आहे. वसई-विरार महानगरपालिकेची स्थापना झाली असून वसई तालुका गृहनिर्माण गजबजल्यानंतर निवारण्यासाठी पालघर तालुक्याकडे एक सुलभ किफायतशीर पर्याय म्हणून पाहिले जात आहे.

पश्चिम रेल्वेची उपनगरीय सेवा विरापर्यंत कार्यरत असताना एप्रिल २०१३ मध्ये उपनगरीय क्षेत्र डहाणू रोडपर्यंत विस्तारित करण्यात आले. मात्र विरार ते डहाणू रोड दरम्यान धावणाऱ्या शटल व मेमू गाडय़ांचे रूपांतर ईएमयु रेक (गाडी)मध्ये करून काही मोजक्या गाडय़ांच्या फेऱ्यात वाढ करण्यात आली. गेल्या आठ वर्षांत पालघर व डहाणू तालुक्यात अनेक मोठया गृहनिर्माण वसाहती उभारल्या गेल्या असल्याने रेल्वे प्रवाशांची संख्या पूर्वीच्या तुलनेत काही पटीने वाढली आहे. मात्र त्या तूलनेत उपनगरीय सेवांमध्ये अपेक्षित वाढ झाली नसल्याने दैनंदिन प्रवास करणाऱ्या उपनगरीय गाडय़ांमध्ये तुफान गर्दी होत आहे. शिवाय यापैकी बहुतांश उपनगरीय सेवा विरापर्यंत असल्याने गाडी बदलण्याचा प्रकिया कालावधीत वाढ होऊन प्रवास त्रासदायक होत आहे.

उपनगरीय सेवा वाढवण्यासाठी रेक (गाडय़ा) उपलब्धतेची तसेच चौपदरीकरण प्रकल्प रेंगाळल्याने गाडय़ा चालवण्याच्या क्षमतेमधील मर्यादा व इतर तांत्रिक कारणे पुढे केली जात आहेत. दुसरीकडे उपनगरीय क्षेत्र घोषित झाल्याने लांब पल्ल्यांच्या गाडय़ांमधून प्रवास करण्यास मज्जाव केला जात आहे. विशेष म्हणजे गर्दीच्या वेळेत एक्सप्रेस गाडय़ाच्या बदल्यात नव्या थेट उपनगरीय सेवा उपलब्ध झाल्या नसल्याने प्रवाशांचा कोंडमारा होत आहे.

करोना संक्रमणाच्या वेळी लांब पल्ल्याची रेल्वेसेवा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर लांब पल्ल्याच्या गाडय़ांची सेवा सुरू करताना त्याच्या वेळापत्रकात मोठय़ा प्रमाणात फेरबदल करण्यात आले. त्यामुळे त्यापैकी अधिकतर गाडय़ा दैनंदिन प्रवाशांना निरुपयोगी ठरल्या व परिणामी उपनगरीय सेवांमध्ये गर्दीमध्ये अधिकच वाढ झाली. नवीन उपनगरीय सेवा सुरू करण्यासाठी रुळांची क्षमता व सेवा चालवण्यासाठी वेळापत्रकात रिकामी ‘स्लॉट’ उपलब्ध नसल्याचे कारण पुढे केले जात असताना दुसरीकडे अतिजलद मालगाडय़ा, सुपरफास्ट गाडय़ा व एक्सप्रेस गाडय़ांची संख्या मात्र गेल्या काही वर्षांत वाढल्या आहेत. विशेष म्हणजे यापैकी काही गाडय़ांना मुंबईनंतर राज्यात एकही थांबा नसल्याचे देखील दिसून आले आहे. त्यामुळे ज्या भागातून मुंबई शहरासाठी उपयुक्त मनुष्यबळ उपलब्ध होत आहे, त्यांना आवश्यक सुखसोई पुरवण्याऐवजी गुजरात राज्यातून येणाऱ्या प्रवाशांचे हित जपले जात आहे. तसेच उपनगरीय क्षेत्रातील प्रवाशांऐवजी उत्पन्न वाढीच्या दृष्टीने रेल्वे व्यवस्थापन विचार करत असल्याचे दिसून आले आहे.

केंद्र सरकार महत्त्वकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्प राबवत असून या प्रकल्पाला बोईसर येथे थांबा देण्यात आला आहे. तर मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाला पालघर तालुक्यात एकमेव जोडणी देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात नव्याने कार्यरत होणाऱ्या या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची वाढीव सोय होईल अशी परिस्थिती तरी सध्या दिसून येत नाही.

मुंबईला पोहोचण्यासाठी अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा एक पर्याय वसई व पालघर तालुक्यांतील नागरिकांसाठी उपलब्ध असला तरी वर्सोवा (घोडबंदर) येथे नव्या पुलाच्या उभारणीचे काम रेंगाळल्याने त्या भागात तुफान वाहतूक कोंडी होत आहे.  अपघात प्रवण क्षेत्र व रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांची स्थिती पाहता या महामार्गावरून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. शिवाय वर्सोवा पुलाजवळ अनेकदा वाहतूक व्यवस्था कोलमडली जात असल्याने या मार्गावरील दुतर्फा वाहतूक काही तास ठप्प होण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. त्याच बरोबरीने मनोर-वाडा- भिवंडी या महामार्गाची अवस्था बिकट असून नवी मुंबई, ठाणेकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून उपयुक्त ठरत नाही.

एकंदरीत या दळणवळणाच्या साधनांचा विचार करता पालघर जिल्ह्यातील मुंबई व उपनगरात पोहोचण्यासाठी सुविधांची वानवा असून राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडून या संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्यास अपयश आल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे या जिल्ह्यातील प्रवाशांना कठीण परिस्थितीला सामोरे  जावे लागत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी प्रश्न  प्रखरपणे मांडण्यासाठी किंवा यासंदर्भातील समस्या सोडवण्यासाठी अपेक्षित पुढाकार घेत  नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विविध नैसर्गिक साधनसामग्री, निसर्गरम्य वातावरण लाभलेल्या पालघर जिल्ह्याला दळणवळणाच्या समस्यांनी ग्रासले आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Benefits communication project vande bharat express train ahmedabad ysh
First published on: 20-09-2022 at 00:02 IST