वाडा – “भिवंडी–वाडा–मनोर” महामार्गावरील रुंदीकरण व काँक्रीटकरणाच्या कामातील हलगर्जीपणाने आणखी एका निष्पाप नागरिकाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

वाडा–मनोर मार्गावरील वरले (किरवली) येथील पेट्रोल पंपासमोर मोरीसाठी खोदलेल्या खोल खड्ड्यात दुचाकी कोसळून रमेश बेंडू पवार (४६, रा. आलमान) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी (दि.१७) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या प्रकरणी ‘ईगल इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंत्राटदाराविरुद्ध वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, वारंवार अपघात होऊनही प्रशासनाने डोळेझाक केल्याने संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पवार हे कामावरून घरी परतत असताना अंधारात कोणतीही सूचना किंवा बॅरिकेड नसल्याने त्यांना खड्ड्याचा अंदाज आला नाही. त्यांची दुचाकी थेट ८ ते १० फूट खोल खड्ड्यात कोसळली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

वाडा – भिवंडी, व वाडा – मनोर महामार्गावरील काम गेल्या काही महिन्यांपासून काम सुरू असून, सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. यापूर्वी अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यात अनेक नागरिकांचा बळी जाऊन कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे. सततच्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

स्थानिकांच्या मते, काम सुरू असताना कोणतेही सुचना फलक, बॅरिकेड्स किंवा पुरेशी प्रकाशयोजना नसल्याने अपघातांची मालिका सुरू आहे. “हा अपघात नसून कंत्राटदार व प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झालेला मनुष्यवध आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

दरम्यान, अपूर्ण व धोकादायक कामांवर तातडीने नियंत्रण आणून नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.