डहाणू : Palghar (Dahanu) Elections update : डहाणू नगरपरिषद निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) सह दोनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले असून त्यांनी एकत्रित येत नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. शुक्रवारी डहाणू येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांनी नगरपरिषद निवडणुकीसाठी नवीन आघाडीची घोषणा केली.
डहाणू नगरपरिषदेसाठी भाजप, शिवसेना (शिंदेगट) आणि महाविकास आघाडी मध्ये मुख्य लढतीचे संकेत असताना महाविकास आघाडीतील डहाणू मध्ये चांगले वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने काढता पाय घेतल्यामुळे सध्या डहाणू शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सोमवारी या नवीन आघाडी कडून नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवक पदांसाठी नामनिर्देशन दाखल करण्यात येणार असून यावेळी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार समोर येणार आहे.
महाविकास आघाडी कडून डहाणू नगरपरिषद लढवण्याचे संकेत असताना राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत गेल्यामुळे आता इतर पक्षांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. पत्रकार परिषदेत संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांनी महाविकास आघाडीतील उर्वरित पक्षांचे देखील सहकार्य आम्हाला मिळेल आणि एकंदरीत सोमवारी एकूण भूमिका जाहीर करू असा इशारा त्यांनी दिला आहे.
डहाणू मध्ये गेल्या काही वर्षांपासून एकाधार शाहीचे वर्चस्व असून आता हे चित्र बदलायचे आहे. तर आमची लढाई भाजप पक्ष आणि युतीसोबत नसून व्यक्तीसोबत आहे अशी भुमिका रविंद्र फाटक यांनी मांडली. तसेच डहाणू शहराचा विकास गेल्या अनेक वर्षांपासून खुंटला असून आता आम्ही एकत्र येऊन डहाणूचा विकास करू असे माजी आमदार आनंद ठाकूर यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष मिहिर शहा, माजी नगराध्यक्ष रवींद्र फाटक, माजी उपनगराध्यक्ष राजू माच्छी सह तीनही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
