पालघर : आपल्या देशाची जगामध्ये चांगली छवी निर्माण करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महत्त्वपूर्ण योगदान असून निवडणूक निकलाबाबत सर्वेक्षणामध्ये कोणतेही भाकित व्यक्त केले तरीही आगामी निवडणुकीत भाजपा केंद्रात सत्तास्थानी राहील, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पालघर येथे व्यक्त केला.
श्री पद्मनाभ स्वामी शिष्य संप्रदाय श्री सद्गुरू पद्मनाचार्य स्वामी महाराजांच्या १११ व्या संजीवनी समाधी महोत्सवानिमित्त ते उपस्थित होते. याप्रसंगी केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, सुनील भुसार, राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
रोजगाराच्या शोधात होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी शहरांच्या धरतीवर गावांचा विकास करण्यासाठी पंचायत राज्य मंत्रालय काम करित असून त्या दृष्टीने १७ शाश्वत विकास उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये शुद्ध पाणी, शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या संधी, स्वच्छ वातावरण, पर्यावरण आदींचा समावेश असून केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांच्या आधारे गावांमध्ये सुधारणा करण्याचे उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. गावातील नागरिकांचे स्थलांतर रोखल्यास शहरातील सुविधांवर त्राण येणार नाही, असे त्यांनी सांगितले. गावामध्ये सुबत्ता येण्यासाठी योजना महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. याच धरतीवर आदिवासी ग्रामपंचायतला आदर्श करण्यासाठी केंद्राची महत्त्वाकांक्षा योजना असून दोन टप्प्यांमध्ये सर्व गावांना आदर्श बनवण्याची उद्दिष्टे ठेवण्यात आली असल्याची त्यांनी माहिती दिली.
पर्यटन व्यवसायामुळे मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होत असून, देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आपले मंत्रालय प्रयत्न करीत असल्याचे श्रीपाद नाईक यांनी सांगितले. राज्य सरकारकडून येणाऱ्या प्रस्तावांना आपला विभाग निधी मंजूर करून देत असून चांगल्या पद्धतीने पर्यटन विकसित करण्यासाठी काही अवधी लागेल असेही त्यांनी सांगितले. या प्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी केंद्रीय मंत्र्यांकडून जिल्ह्याच्या विकासासाठी साकडे घातले, तसेच विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.