बोईसर :अंतर्गत वादातून केलेल्या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची घटना बोईसर जवळ घडली. गोळीबार करणारा आरोपी फरार झाला असून जखमी व्यक्तीला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराच्या घटनेचा तपास सुरू करण्यात आला असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
बोईसर जवळील बेटेगाव येथील चिकन भुजिंग सेंटर मालक उमेश घरत यांनी अंतर्गत वादातून केलेल्या गोळीबारात महागाव वाळवे फाटा येथील सुरेश राजा वरखंडे (५२) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी सुरेश वरखंडे यांना सुरुवातीला बेटेगाव येथील अधिकारी लाईफ लाईन या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गुजरात मधील वापी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अंतर्गत वादातून ही घटना घडल्याचे समोर आले असून उमेश घरत यांच्या चिकन भुजिंग सेंटरमध्ये एक मुलगी लहानपणापासून काम करीत होती. गोळीबारात जखमी व्यक्तीचा मुलगा प्रितेश सुरेश वरखंडे आणि चिकन भुजिंग सेंटरमध्ये काम करणारी मुलगी यांचे दोन वर्षांपासून प्रेम संबंध होते. या दोघांनी १५ फेब्रुवारी रोजी मुरबे येथील मंदिरात विवाह केल्याच्या रागातून उमेश घरत याने सोमवारी पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास सुरेश वरखंडे यांच्या महागाव येथील घरात घुसून पिस्तुलातून गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या गोळीबारात सुरेश वरखडे यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीने बेटेगाव येथील अधिकारी लाईफ लाईन या रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.
पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, पोलीस निरीक्षक, सुनील जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक पथकामार्फत घटनास्थळाचा पंचनामा करून पिस्तूल आणि इतर पुरावे गोळा करण्यात आले आहेत. फरार आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि बोईसर पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक हे करीत आहेत.
