बोईसर : बोईसरमध्ये अंतर्गत वादातून एका मजुराची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे. बोईसर मधील ओसवाल एम्पायर परिसरातील शिवम अपार्टमेंट इमारतीमधील दुकानाच्या बाहेर सोमवारी सकाळच्या सुमारास एका व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला होता. सकाळी नागरिकांच्या लक्षात हा प्रकार येतात त्यांनी याबाबत बोईसर पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी अधिक चौकशी केली असता विजय बेंद्रे (वय ४०) या मजुराचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवून बोईसर रेल्वे स्थानक येथून सुनील तेलगेंडगे या संशयित आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे. मयत आणि आरोपी हे दोघेही एकत्र मजुरीचे काम करीत होते.
रविवारी रात्री त्यांच्यात शुल्लक कारणावरून वाद निर्माण झाला. या वादातून आरोपीने मयत विजय बेंद्रे याच्या पायांवर चाकुने वार करून करून पळ काढला. चाकूच्या वारामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने विजय बेंद्रे याचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन करण्यासाठी तारापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुनील जाधव हे अधिक तपास करीत आहेत.
