बोईसर:  एसटी बसच्या धडकेत दुचाकी वरील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बोईसर जवळील शीगाव येथे घडली. बोईसर ऐना मार्गावर  बसला ओव्हरटेक करताना चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून या अपघात प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बोईसर ऐना मार्गावर एसटी बस आणि दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील शरद घाटाळ (३०) आणि अनिकेत कामडी (१८) या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून या अपघातात विराज  कामडी हा गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास ऐना येथून बोईसर कडे येणाऱ्या एसटी बसला खानिवडे येथील वळणावर  ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी घसरली. यामध्ये दुचाकी वरील दोन तरुण बसच्या मागच्या चाकाखाली येऊन चिरडले केल्याने त्यांचा जागेच मृत्यू झाला. तर तिसरा तरुण बाजूला फेकला गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

अपघातामध्ये मृत आणि जखमी तरुण हे शिगाव येथील रामपाडा येथे राहणारे असून गावावर शोककळा पसरली आहे. अपघाताची खबर मिळताच बोईसर पोलीस घटनास्थळीत दाखल झाले, पोलिसांनी मृत तरुणांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी तारापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी एसटी बस चालकाला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली. या अपघात प्रकरणी बोईसर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.