बोईसर : पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्प अंतर्गत धामणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे धरणामध्ये वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. धामणी धरणातील पाण्याची पातळी स्थिर राखण्याच्या दृष्टीने धरणाचे तीन दरवाजे ०.४० मीटरने उघडण्यात आले असून खालच्या बाजूस असलेल्या कवडास उन्नेयी बंधाऱ्यामध्ये ३९३५ क्युसेक प्रति सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर कवडास उन्नेयी बंधाऱ्याच्या सांडव्यावरून सूर्या नदी पात्रात १४ हजार ३३७ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धामणी धरणातून कवडास बंधाऱ्यामध्ये आणि कवडास बंधाऱ्यातून सूर्या नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने सूर्या नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असून नदीच्या दोन्ही काठावरील गावातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सूर्या प्रकल्प अंतर्गत धामणी धरणाची एकूण पाणी क्षमता २७६ दशलक्ष घनमीटर असून शुक्रवारी सकाळ पर्यंत धरणात २१५ दलघमी (७८ टक्के) पाणीसाठा तयार झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ११८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जव्हारचा डोंगराळ भाग आणि डहाणू तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणामध्ये वेगाने पाणीसाठा निर्माण होत आहे.
धरणातील पाणी पातळी ११४.६० मीटर पर्यंत वाढणे अपेक्षित असून धरणात ११३.६० मीटर तलांकावर पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता धरणाचे तीन वक्रकार दरवाजे ०.४० मीटरने उघडण्यात आले आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या स्थितीनुसार सूर्या नदीपात्रात करण्यात येणाऱ्या विसर्ग मध्ये कमी अधिक प्रमाणात बदल करण्यात येणार असल्याची माहिती पालघर पाटबंधारे विभागामार्फत देण्यात आली आहे.